मुंबई - बेस्ट उपक्रमाच्या बसला काल (शुक्रवारी) रात्री एका रिक्षा चालकाने मागून धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
रिक्षाचालक गंभीर जखमी -
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टची मार्ग A-368, 505 Ltd इत्यादी मार्गावर चालणारी बस काल रात्री 11च्या सुमारास प्रबोधनकार ठाकरे उद्यान बस स्थानक, शिवडी येथून मुलुंड डेपोकडे जात होती. सायन तलावाजवळ राणी लक्ष्मी चौक बस स्टॉपवर प्रवाशांना उतरण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी मागून एक ऑटो रिक्षा आली आणि बसच्या मागच्या मधल्या भागात धडकली. या रिक्षाच्या पुढच्या काचा फुटल्या आणि काच रिक्षाचालकाच्या छातीत घुसल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला.
रिक्षा चालकाचा मृत्यू -
अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाला बसमधील कंडक्टर बाळू भोर आणि ऑटो रिक्षातील एका प्रवाशाने जवळच्या पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात म्हणजेच सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्याला रात्री 11.50 वाजता मृत घोषित करण्यात आल्याची माहिती डॉक्टर अब्दुल शेख यांनी बेस्ट प्रशासनाला कळविले आहे. मोहम्मद वासी कुरेशी शेख असे मृत रिक्षा चालकाचे नाव असून त्याचे वय 59 वर्ष आहे.
हेही वाचा - Mumbai Mega Block : रविवारी उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय !