मुंबई : कोरोनाचा प्रसार कमी होत असला, तरी तो पूर्णपणे गेलेला नाही. गरब्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. कोरोना नियमांचे पालन होणार नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने गरब्यावर घातलेली बंदी ही योग्यच असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. भाजपच्या सेल्फी विथ खड्डा आंदोलनाची खिल्ली महापौरांनी उडवली आहे.
गरब्यावर बंदी योग्यच
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यंदाही गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी गरबा नृत्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना गरब्याला लाख दीड लाख लोक एकत्र येऊ शकतात. त्यावेळी सगळे मास्क लावणार आहेत का? जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न महापौरांनी उपस्थित केले आहेत. गरब्यानिमित्त अर्ध्यापेक्षा अधिक मुंबईकर रस्त्यावर येतील. कोरोना नियमांचे पालन होणार नाही, त्यामुळे गरब्यावर घातलेली बंदी योग्यच असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.
विद्यार्थी पालकांसाठी बेस्ट, रेल्वेला पत्र
४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे त्यांच्या पालकांना शाळेत सोडणे आणि शाळेतून आणणे सोपे व्हावे म्हणून बेस्ट तसेच रेल्वेला पत्र देणार आहे असे महापौरांनी सांगितले. पालकांसाठी 2 डोस सक्तीचे असतील. वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. एक दिवस सोडून वर्ग असतील. 100 टक्के हजेरी सक्तीची नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग मोकळा आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शिक्षकांच लसीकरण झालेलं आहे. त्यांना नियम पालन बंधनकारक आहे असे महापौर म्हणाल्या.
क्लीनअप मार्शलवर गुन्हा
अजून कोरोना संपलेला नाही, प्रत्येकाने मास्क लावावा, यासाठी क्लीनअप मार्शल लावले आहेत. मार्शलकडून जे काही प्रकार सुरू आहेत ते बरोबर नाही, तो गुन्हा आहे. नियमबाह्य काम करणाऱ्या मार्शल आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांवर गुन्हा दाखल केला जाईल. क्लीनअप मार्शलचा ताबा हा पालिकेकडे असावा. क्लीनउप मार्शल म्हणून काम करण्याआधी त्यांची मुलाखत घेणार, त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल असे महापौरांनी सांगितले. सोमवारी यावर पालिका आयुक्तांनी बैठक लावली आहे त्यामुळे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन महापौरांनी केले.
भाजपच्या आंदोलनाची खिल्ली
मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा सेल्फी फोटो काढून आमच्याकडे पाठवा असे आवाहन भाजपाने केले आहे. याबाबत बोलताना त्यांना आंदोलन करू दे. आमच्या नजरेतून कोणते खड्डे चुकले असतील तर कळतील. आम्ही आधी खड्ड्यांना बुवण्याला प्राधान्य दिले आहे.
हेही वाचा - मुंबईत पालकांची संमती घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत घेतले जाईल - महापौर किशोरी पेडणेकर