मुंबई - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थीती आणि मराठवाड्यासह विदर्भ पट्ट्यात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील जनता संकटात सापडली आहे. यासंदर्भातली माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिली.
![Thorat present before Sonia Gandhi reality of floods,drought in Maharashtra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-cong-presi-balasahebthorat-7201153_16082019124557_1608f_1565939757_1086.jpg)
दिल्लीतील 10, जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आज सकाळी थोरात यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात करण्यात येत असलेल्या आघाडीत इतर पक्षांची स्थिती काय असेल आणि जागावाटपाची परिस्थिती काय असेल यावरही चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली. थोरात यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना राज्यातील पूरस्थिती आणि विदर्भ, मराठवाडा येथील दुष्काळाची माहिती दिल्याचे एक ट्विटही केले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. थोरात यांच्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणूगोपाल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, मुजफ्फर हुसेन उपस्थित होते.