मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र भाजप सरकारच्या कार्यकाळात हा प्रस्ताव लाल फितीत अडकला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच ठाकरे यांचा पुतळा उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र, पुतळ्याची जागा बदलल्याने येत्या 23 जानेवारीला म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला पुतळ्याचे अनावरण करणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर 2012 साली मृत्यू झाला. त्यांचा 'गेट-वे ऑफ इंडिया' येथील महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या समोर पुतळा उभारण्याचा प्रस्ताव त्यावेळी मांडण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी 2015 मध्ये ऑक्टोबर महिन्यात संबंधित प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. त्याला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र्र पुरातत्व कमिटीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पुरातत्व कमिटीने पुतळा उभारण्यास मंजुरी दिली.
मात्र, मुंबई अर्बन आर्टस् कमिशन यांच्याकडून अद्याप पुतळा बसवण्यासाठी होकार आलेला नाही. पुतळा उभारताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने सदर प्रस्ताव राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता.
बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यास सर्व परवानग्या मिळाल्या नसताना पुतळ्याची जागा बदलण्यात आली. आधी मंजूर झालेली जागा अपूरी पडणार असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस् इमारतीसमोरील चौकात बसवण्याची सूचना केली. जागा बदलण्याच्या संदर्भातील प्रस्ताव गटनेत्यांनी तात्काळ मंजूर केला. त्यामुळे जागा बदलाच्या सर्वच परवानग्या पालिका प्रशासनाला नव्याने घ्याव्या लागत आहेत. महापालिकेच्या काही परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, राज्य गृहमंत्रालय आणि हेरिटेज कन्जर्वेशन कमिटीची अद्याप परवानगी मिळालेली नाही. जोपर्यंत परवानग्या मिळत नाहीत, तोपर्यंत पुतळा उभारण्याचे काम राखडणार आहे.
आम्ही प्रयत्नशील
आम्ही परवानग्या मिळवण्याच्या प्रयत्नात असून 22 जानेवारी पर्यंत परवानग्या न मिळाल्यास जानेवारी महिन्याच्या अखेर पर्यंत पुतळा उभारून त्याचे अनावरण करण्यात येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
कुठे उभारला जाणार पुतळा ?
दक्षिण मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया' जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा नऊ फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. यासाठी दोन फूट उंच हिरवळ (लँडस्केप) तसेच 11 फूट उंच चबुतरा उभारण्यात येणार आहे. येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांची 94 वी जयंती आहे. त्याच दिवशी बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, या प्रक्रियेला विलंब होणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.