मुंबई - राज्यात सात ते आठ महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडत होते. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व व्यवहार पूर्ववत होत आहेत. सोमवारपासून मंदिरे उघडण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली. मात्र, कोरोना अजून गेला नसून नियमांचे पालन करून सर्व काम करण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचेही सांगण्यात येत आहे. त्यातच आज (मंगळवार ) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. आज स्मृतिदिनाला देखील गर्दी न करता, योग्य खबरदारी घेत अभिवादन करण्याचे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचे सहकुटुंब शक्तीस्थळावर अभिवादन -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब सकाळी ११:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आले. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. इतर शिवसेना नेते आणि मंत्र्यांनीही आज शिवाजी महाराज पार्कवर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. कोरोनाचा संसर्ग सुरू असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क आणि शारिरीक अंतर ठेवणे बंधनकारक असणार आहे. दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम होणार नाही, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - ...तर भाजपाची शिवसेनेला फसवण्याची हिंमतच झालीच नसती
अन्य पक्षाचे नेतेही येणार
शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या स्मृतिदिनाला राज्यभरातील शिवसैनिक दरवर्षी शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात, त्यांना आदरांजली वाहत असतात. अनेक राजकीय नेतेही बाळासाहेबांना शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येतात. राज्यात असलेल्या महाविकास आघाडी समीकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेही बाळासाहेबांच्या सृतिस्थळाला भेट देत आदरांजली वाहतात. पण यंदा कोरोनाची परिस्थिती असल्याने कमी प्रमाणात शिवसैनिक आणि मोजकेच काही नेते येण्याची शक्यता आहे.
अभिवादन आहे तिथून करा
स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून स्मृतिस्थळावर दरवर्षी जोरदार तयारी करण्यात येते. मात्र, यंदा साध्या पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे यंदा शिवसैनिकांसोबत अनेक राजकीय पक्षांचे नेतेही यंदा स्मृती स्थळावर जाता येणार नाहीत, म्हणून समाज माध्यमावर बाळासाहेब ठाकरे यांना दरवर्षी प्रमाणे अभिवादन करतील.
हेही वाचा - बाळासाहेबांचा स्मृतिदिन : असाल तेथून अभिवादन करा, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन