मुंबई- कोरोना संकटामुळे आंबेडकरी अनुयायांना सलग दुसऱ्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी लागणार आहे. आंबेडकर जयंती म्हटली आंबेडकरी शाहीरांची कलापथके व गायक यांच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात आंबेडकरी वसाहतीत केले जाते. या कार्यक्रमातुनच या कलाकारांचा संसाराचा गाडा चालत असतो. मागील दोन वर्षांपासून त्याच्या हातात कार्यक्रम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती जल्लोषात साजरी होईल, असे वाटत असताना पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात, देशात याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे राज्य सरकारने आंबेडकर जयंती ही साधेपणाने साजरी करा, असे अनुयायांना आवाहन केले आहे. मात्र, या सपूर्ण परिस्थितीचा फटका आंबेडकरी कलावंताना बसला आहे. अनेक कलाकार आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम करत असतात. कार्यक्रम 12 एप्रिलपासून सुरू होतात. जूनमध्ये पाऊस सुरू होईपर्यंत विविध ठिकाणी जयंती महोत्सव साजरा असतो. यामध्ये मिळणाऱ्या मानधनातून कलाकाराचे घरखर्च चालत असतात. मात्र, यंदा सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत.
हेही वाचा-...बाबा अजूनही रुग्णालयातच; खासदार सुप्रिया सुळे यांची भावनिक फेसबूक पोस्ट
कोरोनामुळे सर्व रोजगार संपला-
गायक संदेश विठ्ठल उमप म्हणाले की, गेले अनेक वर्ष गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे काम कलाकारांनी केले आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी अनेक आंबेडकरी कलावंतांना आणि वाद्यवृंद ग्रुपला गाण्यासाठी बोलविण्यात येते. दोन महिन्यात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आमच्या ग्रुप दोन महिन्यात कमीत कमी शंभर कार्यक्रम करत होते. यातून प्रत्येकाला रोजगारदेखील प्राप्त मिळत होता. मात्र कोरोनामुळे सर्व रोजगार संपला आहे. यामुळे सरकारने शासकीय कार्यक्रम दिले पाहिजेत किंवा दोन महिने दहा हजार रुपये खर्च दिला पाहिजे, अशी मागणी गायक उमप यांनी केली आहे.
हेही वाचा-सातारा: जावळीतील दहावीच्या 11 विद्यार्थ्यांना कोरोना
अन्यथा आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल-
कलाकार विवेक गायकवाड म्हणाले की, आमचा ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून देशभरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम करतो. पण गेल्या दोन वर्षांपासून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हातात कार्यक्रम नाही. घर चालवायला पैसा नाही, अशी वेळ आमच्यावर आली आहे. राजकीय कार्यक्रमाला परवानगी मिळते. मग महापुरुषांच्या जयंतीला का नाही, असा प्रश्न आम्हाला पडतो. राज्य सरकारने एक तर आम्हाला कार्यक्रम द्यावे. अन्यथा आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी कैफियत कलाकार विवेक गायकवाड यांनी मांडली आहे.