मुंबई - मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी स्पर्धा घेण्यात येणार होती. मात्र या स्पर्धेशी शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे नाव जोडले गेले. यानंतर भाजपाने देखील हिंदुत्त्वाचा विषय पुढे करत या प्रकरणी शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या हिंदुत्त्वावर टीका करण्यात आली. यावर संजय राऊत यांनी बॅटिंग करत अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र याबाबत मुस्लीम नेत्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला आहे.
शिवसेनेने अजान स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेला भाजपाने आक्षेप घेतला आहे. मात्र, सोलापूर व इतर जिल्ह्यात घेण्यात आलेल्या गीतापठण कार्यक्रमात मुस्लीम मुलींनी पहिला क्रमांक पटकावल्याची आठवण अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी करून दिली आहे. दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमांमध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. हे करताना त्यांनी मंदिरांमधील अनेक सीनही केले आहेत. याचा अर्थ त्यांनी धर्मांतर केलं, असा होत नाही. असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
सामना वृत्तपत्रातील अग्रलेखाचे स्वागत करत असल्याचे मुस्लीम बांधवांनी सांगितले. अजान स्पर्धेला शिवसेना नेत्यांनी समर्थन केले यात चुकीचे काय आहे. अनेक धर्मांचे लोक राजकारण्यांकडे जातात. त्यांची मदत घेतात. याबाबत पक्षांनी घाणेरडे राजकारण थांबवले पाहिजे. भारतातील मुस्लीम हा भारतीयच आहे, असे शिवसेनेने त्यांच्याबाबत कोणतीही हीन भावना ठेवली नाही.असे मुखपत्रात म्हटले आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मुस्लीम कार्यक्रमांना मदत केली. भारत हा देश संविधानाने चालतो. शिवसेनेची भूमिका ही घटनेला पकडूनच आहे. यामुळे याचे राजकारण करणाऱ्या पक्षांनी त्यांचे हे थांबवले पाहिजे, असे प्रोग्रेसिव्ह मुस्लीम फ्रंटचे अध्यक्ष निसार अली यांनी सांगितले.
हे तर भाजपाचं घाणेरडं राजकारण!
अजान स्पर्धेचा मुद्दा उचलून भारतीय जनता पक्षाने घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. कोणत्याही समाजातील व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. तुमच्या बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. या स्पर्धेतून त्या धर्माचा चांगलेपणा लोकांसमोर येतो. महाविकास आघाडी ही धर्मनिरपेक्षता मानते. मात्र भारतीय जनता पक्ष जे राजकारण करत आहे, ते देशासाठी हानिकारक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अब्दुल अन्सारी म्हणाले.
शिवसेनेचा यू-टर्न?
अजानचा आवाज हा माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचतो. तो आवाज ऐकून कानाला बरे वाटते. काही दिवसांपूर्वी शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी 'अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनीटांच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे', असे सांगितले. मात्र आता ते वक्तव्यावरून यू-टर्न घेत आहेत. असा कोणता आवाज झाला, ज्याने सकपाळ यांना त्रास द्यायला सुरुवात केली. हा आवाज कोणता आहे, देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला हे जाणून घ्यायचे आहे. याचे उत्तर सकपाळ यांनी दिले पाहिजे, असे मौलाना मुफ्ती मंजुर यांनी म्हटले.