मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत हैद्राबाद येथे आज सीबीआयने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. त्या चौकशीत शुल्का यांनी अनेक गौप्यस्फोट केले असल्याचा दावा भाजपचे आमदार अतुल भातखळर यांनी केला आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी रश्मी शुक्ला यांच्या चौकशीबाबत ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबादमध्ये सीबीआय चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे, असा टोला भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकाला लगावला आहे.
हेही वाचा-फोन टॅपिंग प्रकरण : जबाब नोंदवण्यास रश्मी शुक्ला असमर्थ, दिले कोरोनाचे कारण
वापरकर्त्याचे खोचक ट्विट
आमदार भातखळकर यांच्या ट्विटवर एका वापरकर्त्याने खोचक प्रतिक्रिया देणारे ट्विट केले आहे. या वापरकर्त्याने म्हटले, की हे तुम्हाला सीबीआयने सांगितले की, रश्मी शुक्लांनी! किमान ट्विट तरी असे करा की, हे भाजपचे षडयंत्र वाटणार नाही. न्यूजवाल्यांच्या व एजन्सींच्या अगोदर चौकशीचे विषय तुम्हाला माहितच कसे होतात? असले भौचक ऊद्योग सोडा, नाहीतर जनता तुमचाच कार्यक्रम करणार हे निश्चित, असा टोलाही या वापरकर्त्याने भाजप नेत्याला लगावला आहे.
हेही वाचा-फोन टॅपिंग प्रकरण : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांचे समन्स
रश्मी शुक्ला यांच्या जबाबातून काही तपशील बाहेर येत आहेत. या जवाबातून फार संवेदनशील माहिती समोर येईल, असे सांगण्यात येत होते. महाराष्ट्र पोलिसांनी शुक्ला यांना समन्स बजावले होते. पण त्या आधीच सीबीआयने ते सध्या तपास करत असलेल्या प्रकरणात शुक्ला यांचा जबाब नोंदविला आहे.
बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप-
आपल्या पदाचा गैरवापर करत, मंत्र्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स पाठवण्यात आले आहे. समन्समध्ये रश्मी शुक्ला यांना 28 एप्रिल रोजी सायबर सेल स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. याप्रकरणी 27 मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. या अहवालानंतर अज्ञातांविरोधात विविध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने आता रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदविला जाणार आहे.