मुंबई - "ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर ( Silver Oak ) हल्ला केला 'त्या' एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले गेले. याचा अर्थ सिल्व्हर ओकवर हल्ला करण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांना कुणी फुस लावली होती हे लक्षात येते असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ( State President of Nationalist Congress Party ) माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी केला. जयंत पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना हा हल्ला चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी काल घेतलेल्या परिवहन मंडळाच्या बैठकीत निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेवर रुजू करण्याचा ( Suspended ST employees resume service ) निर्णय घेतला. या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या घरावर हल्ला करणारे कर्मचारी देखील आहेत. शासनाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस कडून विरोध ही करण्यात आला आहे.
शहांची तुलना आई-वडिलांशी करणे चुकीचे - भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची तुलना आई-वडिलांशी केली होती. एक वेळेस आई-वडिलांना शिव्या दिल्या तर, चालतील पण मोदी शहा यांना शिव्या सहन केल्या जाणार नाहीत असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आई-वडिलांना शिव्या देणे अत्यंत चुकीचे आहे. मराठी माणसे असे कधीही करत नाही. चंद्रकांतदादा यांना आई-वडिलांना शिव्या द्या असे सांगणे हे योग्य आहे असे, मला वाटत नाही. मोदी - शहांची तुलना आई-वडिलांशी करणे हे तर अत्यंत चुकीचे आहे. हे हिंदू संस्कृतीमध्ये बसत नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
रश्मी शुक्लावर बोलणे उचित ठरणार नाही - रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू होती त्या प्रकरणात नेमके काय समोर आले आहे. क्लोजर रिपोर्टमध्ये काय लिहिले आहे हे पाहिल्याशिवाय त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. जर क्लीनचीट दिली असेल तर त्यामध्ये त्याची कारणे लिहिली असतील असेही जयंत पाटील म्हणाले.