मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका शहरातील नागरिकांप्रमाणेच आदिवासींना देखील बसला आहे. मोल-मजुरी आणि रोजगार बंद असल्याने खायचे काय, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. ठाण्यातील शहापूर येथे तीन आदिवासी पाड्यांतील आदिवासींचे 'मायबाप' म्हणून मुंबईतील काही तरुण पुढे आले आहेत. या तरुणांनी हे तिन्ही पाडे दत्तक घेतले असून कोरोनाच्या काळात त्यांना अन्नधान्य, मास्क, सॅनिटायझर्स पुरवले. आता 'निसर्ग' चक्रीवादळाच्या संकटातही हेच तरुण या आदिवासींच्या मदतीला धावून आले आहेत.
सुरुवातीला येथे त्यांनी 4 हजार 525 झाडे लावली. यामध्ये प्रमुख्याने आंबा, पेरू, जांभूळ अशी फळझाडे होती. काही वर्षांनी आदिवासींना फळे विकून पोट भारता येईल, हा या मागचा हेतू होता. तर या गावातील मुलांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्य पुरवले. गावात मूलभूत गरज नसताना येथील महिला-मुलीना सॅनिटरी नॅपकीन देण्यात आले. याबाबत त्यांच्यात जागरूकता करण्यात आली. महिलांचे आरोग्य लक्षात घेता तीनही पाड्यांत दर महिन्याला सॅनिटरी पॅडचे वाटप सुरू झाले. आज 80 टक्के महिला-मुली पॅड वापरत असल्याचे सागर जैन याने सांगितले. आताच हे गाव दत्तक घेतल्याने या गावाचा विकास कसा करायचा, यावर काम सुरू होते. अशातच कॊरोना आला आणि आदिवासीयांचे जगणे आणखी अवघड झाले. रेल्वे स्थानकाबाहेर, बाजारात भाज्या-फळे विकणे, मोल-मजुरी करणे या त्यांचा पोटापाण्याचा धंदा. पण लॉकडाऊनमध्ये सगळेच बंद झाले. या तीनही पाड्यातील आदिवासींसमोर जगण्याचा तिढा तयार झाला.
पण या कोरोनाच्या काळात मुंबईतून ही मुले या पाड्यांत धावून गेली. अगदी कॊरोनाची भीती न बाळगता. त्यानुसार त्यांनी तीनही पाड्यात अन्नधान्य वाटप केले. सॅनिटायझर्स, स्टँड, मास्क दिले. त्यांच्या पोटाचा प्रश्न सोडवला. कॊरोनाचे संकट जात नाही, तोपर्यंत ही मदत त्यांना पुरवणार असल्याचे सागरने सांगितले. पण अशातच निसर्ग चक्रीवादळात अनेक झाडांचे आणि इतर नुकसान झाले. त्यामुळे या टीमने पुन्हा पाड्यात धाव घेत आवश्यक ती मदत केली. मुलांना शैक्षणिक साहित्य ही दिले. यापुढे अन्यही मदत केली जाणार असल्याची माहिती सागरने दिली आहे.
विशेष म्हणजे, हे सर्व काम कुठल्याही सरकारी मदतीशिवाय सुरू असून टीममधील प्रत्येक जण आपापल्या परीने आर्थिक भार उचलतात. तर, मदतीसाठी ते सर्वसामान्य नागरिकांना मदतीचे आवाहन करतात. त्यावर या संस्थेचे काम सुरू आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या काळात या तरुणांनी हजारो पोलिसांना फेसशिल्डचे वाटप सुद्धा केले आहे.