मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत विश्वासदर्शक ठरावाची वाट न पाहता तातडीने राजीनामा द्यावा. तसेच अजित पवारांनीही झालेली चूक विसरून राजीनामा द्यावा आणि परत यावे, असे मत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी;जयंत पाटील नवे पक्षनेते
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पत्र दाखवून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याचे अवलोकन केले तर लक्षात येते की अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची फसवणूक केली आणि फडणवीस यांनी राज्यपालांची फसवणूक केली. कारण, ज्या आमदारांच्या यादीच्या आधारावर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यातील ४-५ आमदार वगळता इतर सगळे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे भाजपकडे बहुमताचा आकडा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
राज्यपालांनी बहुमताच्या संख्याबळाबाबत सखोल चौकशी करून निर्णय घ्यायला हवा होता किंवा आमदारांची ओळखपरेड करायला हवी होती. राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेल्या सह्या भाजपला पाठिंबा देण्यासाठी होत्या की काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी होत्या, याची शहानिशा राज्यपालांनी करून घ्यायला हवी होती, असेही चव्हाण म्हणाले.
या प्रकरणात राज्यपालांची दिशाभूल झाली आहे. राज्यपालांनी देखील सत्यता पडताळून पाहिलेली दिसत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मध्यरात्री मागे घेतली जाते. या सर्व घडामोडी रात्रीच्या अंधारात होतात. त्यामध्ये कोणतीही पारदर्शकता नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे अशोक चव्हाण म्हणाले.