मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी 20 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. (MCA president election) विशेष म्हणजे तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेत्यामध्ये ही अध्यपदाची लढत रंगणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष व भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी संघटनेचे अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील (sandeep patil) यांनी सुद्धा ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहिर केले आहे. (ashish shelar vs sandeep patil)

११ वर्षांनी पुन्हा रंगणार सामना? : एमसीएची ही बहुचर्चित निवडणूक मागील महिन्यात २८ सप्टेंबरला होण्याची शक्यता होती, पण काही कारणांमुळे त्यावेळी निवडणूक न होता ती पुढे ढकलण्यात आली. याआधी म्हणजेच २०११ मध्ये माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात अध्यपदासाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी विलासरावांनी वेंगसरकरांना मात दिली होती. विशेष म्हणजे आता तब्बल ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेत्यामध्ये एमसीए अध्यपदासाठी लढत रंगणार आहे. आता यंदाही राजकीय नेता क्रिकेटपटू वर भारी पडणार की, संदीप पाटील आशिष शेलारांना मात देणार याकडे राजकीय नेत्यांसह क्रीडा विश्वाचंही लक्ष लागलं आहे.

आशिष शेलार यापूर्वीही होते अध्यक्ष: निवडणुकीसाठी ६ ते 10 ऑक्टोबर दरम्यान अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. माझा अर्थात शरद पवार गटाचा अर्ज ६ ऑक्टोबरला दाखल होणार, असे संदीप पाटील यांनी सांगितले आहे. यापूर्वी शेलार 2015 मध्ये उपाध्यक्षपदी निवडून आले होते. त्यानंतर 12 जानेवारी 2017 रोजी त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. लोढा शिफारशींच्या सूचनेमुळे शरद पवार यांना संघटनेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते, त्यामुळे तेव्हा शेलार यांच्याकडे सूत्रे आली होती.