मुंबई - कमला मिल कम्पाऊंडमध्ये दोन वर्षांपूर्वी आग लागून चौदा जणांचा मृत्यू झाला होता. रात्री या ठिकाणच्या पंचतारांकित पब हॉटेलमध्ये मैफिली रंगली होती. मात्र, प्रत्यक्षात या जागी माहिती तंत्रज्ञान (आय.टी) व त्याच्याशी संबंधित उद्योगालाच या जागेवर व्यावसायासाठी परवानगी देण्यात आली होती. आगीच्या दुर्घटनेनंतर या कम्पाऊंमधील अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाचा घोटाळा, जागेच्या वापरात बदल व सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे उजेडात आले होते. यामध्ये घोटाळा झाल्याचे स्वत: पालिका आयुक्तांनी सांगितले होते. मात्र, कारवाई अद्याप झालेली नाही, त्यामुळे भाजपने उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
आज सकाळी या कमला मिल प्रकरणी आणि नाईट लाईफ बद्दल भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले मी कमला मिलमध्ये लागलेल्या आगीच्या वेळी सातत्याने सांगत होती की कमला मिलमध्ये एफएस आय चा घोटाळा करण्यात आला आहे. मी चौकशीची मागणी केली. अखेर चौकशीतून घोटाळा उघड झाला. आता तरी पालिका कठोर कारवाई करणार का? फौ जदारी गुन्हे दाखल करणार का? असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून पालिका आणि सरकारला विचारला आहे.