मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपचे हिंदुत्व हे बेगडी असून राजकीय स्वार्थासाठी ते चावून फेकण्याचा चोथा नसल्याची टीका भाजपवर केली गेली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी या टीकेला उत्तर देताना सामनाचा अग्रलेख हा शिवसेनेचे वैचारिक दारिद्र्य असल्याचे सांगत शिवसेनेचा भगवा रंग उडालाय तो रंग लावण्याचा वायफळ प्रयत्न सुरू आहे. या अग्रलेखाचा मी निषेध करतो, असे शेलार यांनी म्हटले. कला चित्रकार, शिल्पकार यांना घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात अशिष शेलार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका -
शेलार यांनी सध्या मुंबईत सुरू असलेल्या ड्रग्स प्रकरणावरून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरही जोरदार टीका केली. स्वतः काही करत नाहीत आणि तपास यंत्रणांना काम करू देत नाहीत असे सांगत देशातील कोणत्या राज्यातील मंत्र्याचा जावई गंजेडी म्हणून पकडला गेला आहे? अशा मंत्र्याला लाथ मारून हाकलून काढले पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांवर डाव्या, उजव्या बाजूने कोणाचा दबाव असेल तर भाजप त्यांच्या बाजूने आंदोलन करेल, असे सांगत ड्रग्स प्रकरणावरून सातत्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना धमकावणारे नवाब मलिक यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई न केल्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहित भारतीय यांनी नवाब मलिक यांच्यावर लावलेले आरोप गंभीर असून मालिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा शेलार यांनी केली आहे.
हे ही वाचा - एनसीबीकडून मुंबईतली वांद्रे परिसरात 3 ठिकाणी छापेमारी