मुंबई - काल दिवसभर तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसला आहे. जवळपास चारशे ते पाचशे झाड उन्मळून पडले, असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. त्यातील कित्येक झाडे वाहनांवर पडले आहेत, त्यामुळे वाहनांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे झाडे रस्त्यावरून उचलले नाहीत, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
80 ते 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता
दोन दिवसांपासून मुंबईवर घोंगावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळाचे संकट टळले असले, तरीही त्याचा प्रभाव दुसऱ्या दिवशीही कायम आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर 80 ते 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दुसऱ्या दिवशीही पावसाचा प्रभाव कायम
मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. सोमवारी रात्रभर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे झाडे कोसळून पडले, तर काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुसऱ्या दिवशीसुद्धा पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. बोरीवली, सांताक्रूझ, चेंबूर, मुलुंड, कुलाबासह संपूर्ण मुंबईत पावसाची शक्यता आहे.
शहरात 104, तर उपनगरात 114 मिलिमीटर पावसाची नोंद
मुंबईत चक्रीवादळामुळे शहरात 104, तर मुंबई उपनगरात 114 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत आणि उपनगरात 50 ते 60 किमी वाऱ्याचा वेग नोंदवला गेला आहे. तर कुलाबा येथे 114 किमी वाऱ्याचा वेग नोंदवला आहे. काही ठिकाणी भिंती तर काही ठिकाणी घराचा भाग पडला आहे. 479 ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या तुटण्याची नोंद झाली आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेली आहे.
हेही वाचा - अमरावतीत तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त