मुंबई : आर्यन खान प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्लीतील एसआयटीच्या पथकाने सोमवारी मुंबईतील विविध ठिकाणांची पाहणी सुरू केली आहे. एनसीबीचे उपमहासंचालक आणि व्हिजिलन्स टीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील कॉर्डेलिया जहाजावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली. तसेच तेथील अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चाही केली. प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांत ज्या ठिकाणी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि प्रभाकर साईल यांची भेट झाली त्या लोअर परेल येथील ठिकाणांची देखील पाहणी केली आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ज्ञानेश्वर सिंह यांच्यासह 7 अधिकारी चौकशी करत आहेत. या प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेले किरण गोसावी आणि त्याचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलची चौकशी करण्यात येणार आहे. व्हिजिलन्स टीम एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर 25 कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या आरोपांबाबत चौकशी करत आहे. प्रभाकर साईलने एक व्हिडिओ प्रसारित करत वानखेडेंनी आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपये खंडणी मागितली असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची दिल्लीच्या एनसीबी टीमकडून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांची दिल्लीतील 5 अधिकाऱ्यांच्या पथकाने 4 तास चौकशी केली होती. या टीममध्ये आता वाढ करण्यात आली आहे. 7 अधिकाऱ्यांची टीम करण्यात आली आहेत.
साईलची आज चौकशी
खंडणी प्रकरणात मुख्य साक्षीदार आणि आरोप करणारा प्रभाकर साईल याची चौकशी अद्याप झाली नाही. तसेच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे कोर्टाद्वारे गोसावीचा जबाब नोंदवण्यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली होती. सोमवारी प्रभाकर साईलला दुपारी 2.30 वाजता सीआरपीएफ कॅम्प सांताक्रूझ येथे चौकशी करण्याकरिता बोलवण्यात आले आहे. तसेच खंडणी प्रकरणात ज्या लोकांची चौकशी करण्याची गरज भासेल त्या सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला चौकशीकरिता समन्स देण्यात आला आहे. तर पूजा दादलानीचीही चौकशी करण्यात येणार आहे.
प्रभाकर साईलचे आरोप काय
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साईल यांचा दावा आहे. आपण के.पी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.
त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.