मुंबई: गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. दहशतवाद्यांनी महिन्याभरात सहा जणांना ठरवून संपवल्याने काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. मुंबईत आपल्या निवासस्थानी ते बोलत होते.
कश्मिरी पंडितांवरील अत्याचार थांबत नाहीत -
काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या हल्ल्यांवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजही कश्मीरमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली. कश्मीर फाईलच्या चित्रपट निर्मात्याने गृहमंत्री व पंतप्रधानांच्या कृपेने चारशे ते पाचशे कोटी रुपये कमावले. परंतु काश्मिरी पंडितांचा मुद्दा ( issue of Kashmiri Pandits ) आजही तसाच आहे. मोदी सरकारने 370 कलम हटवले, कश्मीर फाईल चित्रपट आणला. परंतु त्याने काश्मिरी पंडितांचे काय भले झाले? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मशिदीत शिवलिंग कशाला शोधता?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत ( RSS Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat ) यांनी काल मशिदीतील चित्रीकरणावर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, बोलताना प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग कशासाठी शोधत आहात असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मंदिरावर संघर्ष करण्यापेक्षा कश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील ते बघणे गरजेचे आहे. देशात सध्या मंदिर मशिद यामध्ये संघर्ष सुरु आहे, यापेक्षा कश्मीरमधील कश्मिरी पंडितांचा जीव महत्त्वाचा असल्याचही संजय राऊत यांनी सांगितले. त्यासाठी केंद्राने सर्वतोपरी सुरक्षा देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
आमदारांना कोटी-कोटी रुपये देणारे कोण आहेत?
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महा विकास आघाडीचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस ( MVA Delegation meet Devendra Fadnavis ) यांना भेटत आहे. याविषयी संजय राऊत यांना विचारले असता, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. आजचे वातावरण गढूळ झालेले आहे. घोडेबाजार नावाचा शब्द अत्यंत वाईट प्रमाणात राजकारणात रुजू झाला आहे. आमदारांना कोटी-कोटी रुपयांची प्रलोभनं दाखवणारे कोण आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी इतका पैसा कुठून दिला जातो. याचा विचार महाराष्ट्रातील जनतेने व केंद्रीय तपास यंत्रणेने करणे गरजेचे आहे. हा पैसा येतो कुठून असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच सर्व पक्षीय नेते जर महाराष्ट्राच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांना भेटत असतील व त्यातून जर चांगला मार्ग निघत असेल, तर त्यात काय वाईट आहे. असे सांगताना राज्यसभेची सहावी जागा बिनविरोध व्हायला पाहिजे असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा - राज्यसभा, विधानपरिषद निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न, दुपारी तीन पर्यंत चित्र स्पष्ट होईल - भुजबळ