मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2018 मधील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
चार नोव्हेंबरला अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी तसेच फिरोज शेख आणि नितीश सारडा यांना अटक केली आणि त्यांनतर सेशन कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक केली होती. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामीन याचिका दाखल केली. कोर्टाने अर्णबच्या अर्जावर आपला आदेश राखून ठेवला आणि सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला. सोमवारी त्यांनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. घरातून अटक झाल्यानंतर 8 नोव्हेंबरपर्यंत अर्णब गोस्वामी यांना क्वारांटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते, नंतर त्यांना नवी मुंबईच्या तळोजा जेलमध्ये पाठविण्यात आले.
काय आहे प्रकरण ?
अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गेल्या बुधवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना थेट अलिबाग कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. या निर्णयाला आव्हान देत ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत गोस्वामींच्यावतीने हायकोर्टात अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर विस्तृत सुनावणी घेत हायकोर्टानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. व त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याला आव्हान देत गोस्वामी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.