मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधात मी खटला लढवत असल्याने माझ्यावर सूडबुद्धीतून कारवाई करण्यात आल्याचा युक्तिवाद वकील सतीश उके (Satish Uke) यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या PMLA न्यायालयात (PMLA Court) केला आहे. ईडीने जमीन घोटाळा प्रकरणात गुरुवारी (31 मार्च) नागपूरवरून सतीश उके यांच्यासह त्यांचे भाऊ यांना अटक केली होती. त्यानंतर आज मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी सतीश उकें यांनी हा युक्तिवाद केला आहे.
कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले हे सांगितले नाही - मी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींविरोधात खटले लढलो आहे. न्या. लोया प्रकरणात माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मला धमकावण्यात आले असल्याचा दावा उके यांनी आपल्या युक्तिवादात केला. मला ताब्यात घेताना सांगण्यात आले नाही की कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले जात आहे. 2016 मध्ये लोयांची केस हाताळताना माझावर हल्ला झाला होता. मी पोलीस तक्रार केली पण घेतली नाही. माझ्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती उके यांनी न्यायालयात दिली.
लोया यांचे प्रकरण हाताळताना माझ्यावर हल्ला - वकील उके यांनी म्हटले की, 2016 मध्ये न्या. लोया यांचे प्रकरण हाताळताना माझ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची मी पोलीस तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. माझ्या कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आपण वकील झाल्यापासून सामाजिक कार्यात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.
थेट छापेमारी करून समन्स देण्यात आले - सतीश उके हे विविध राजकीय नेत्यांच्या केसेस लढत आहेत. उके यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना का अटक करण्यात आली याची माहिती देण्यात आली नाही असे उकेंच्या वकिलांनी सांगितले. कायद्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी हे करणे गरजेचे आहे. समन्स 10.30 वाजता पाठवण्यात आले. त्याआधीच छापेमारी करण्यात आली. टेक्निकली त्यांना सकाळी 6.30 वाजताच अटक झाली होती. अजून ही अटक कोणत्या ग्राउंडवर आहे, याची उके किंवा त्यांच्या कुटुंबीयांना माहिती नाही, असे उकेंच्या वकिलांनी म्हटले. आम्हाला नोटीस का देण्यात आली नाही. थेट छापेमारी करून समन्स देण्यात आले. छापेमारीसाठी पोलिसांची मदत न घेता थेट सीआरपीएफची मदत घेतली गेली. जणू उके हे दहशतवादी किंवा गुन्हेगार असल्याचे भासवले, असा युक्तीवाद करण्यात आला.
मी झोपेत असताना माझ्या बेडरूममध्ये सीआरपीएफचे जवान - यानंतर उके यांनी स्वत: युक्तिवाद केला. मी झोपेत असताना माझ्या बेडरूममध्ये सीआरपीएफचे जवान AK47 बंदूक घेऊन आले. माझे वडील आजारी आहेत. अशा वेळी घरात घुसून कारवाई करण्यात आली. मी आधी आर्किटेक्ट होतो. नंतर कायद्याचे शिक्षण घेऊन 2007 साली वकिली सुरू केली. मी फडणवीस-गडकरी यांच्या विरोधात खटले लढले, असे उके यांनी युक्तिवादात सांगितले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक समजले जाणारे वकील सतीश उके यांना ईडीने गुरुवारी अटक केली. त्यानंतर आज त्यांना विशेष न्यायालयात हजर केले. जमीन व्यवहारांसंबंधी एका प्रकरणात ईडीने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर छापा मारला होता. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. ईडीने सतीश उके यांच्या भावालाही ताब्यात घेतले आहे.