मुंबई - शिक्षण क्षेत्रात आपले भविष्य घडवण्यासाठी तयार असलेल्या भावी शिक्षकांना दिलासा देण्याचे काम शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता देण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे.
निर्माण होणार गुणवंत व कार्यक्षम शिक्षक
शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षात झाले नव्हते. सन २०१८-१९नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात, परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त आहे. इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे.
दोन वर्षे परीक्षा रद्द झाल्या
२०१९साली लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा घेता आल्या नाहीत. शालेय शिक्षण विभागाने मागील आठवडय़ात ६१०० शिक्षकांची भरती करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.