मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या आमदारांचा समन्वयक म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र वायकर हे शिवसेनेचे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार व माजी कॅबीनेट मंत्री आहेत.
या आधी युती सरकारमध्ये वायकर यांनी उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्रिपद भूषविले आहे. वायकर हे मातोश्रीच्या नेहमीच जवळचे राहिले आहेत. यंदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने त्यांची यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात समन्वय प्रमुख म्हणून जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विरोधकांच्या टिकेनंतर तो प्रस्ताव देखील बारगळला. अखेर या निष्ठावान शिवसैनिक असलेल्या आमदार वायकरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या आमदारांचा समन्वय म्हणून नियुक्ती करून पुर्नवसन करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत रवींद्र वायकर हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील समन्वयक म्हणून काम करतील असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला .शिवसेनेच्या आमदारांचा अडलेल्या कामांचा पाठपुरावा रवींद्र वायकर करतील. उद्धव ठाकरे यांनी चार तास शिवसेना आमदारांच्या झालेल्या बैठकीत हे आदेश दिलेत.