मुंबई - राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी आता खासगी रुग्णालयातील परिचारिकांची सेवा अधिग्रहित करण्यास सुरुवात झाली आहे. पेणमधून याला सुरुवात झाली असून राज्यातही अशा प्रकारे खासगी परिचारिका या कामासाठी अधिग्रहित केल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे. परिचारिकांनी मात्र याला जोरदार विरोध केला आहे. खासगी रुग्णालयातील परिचारिका अशाप्रकारे कमी झाल्यास खासगी रुग्णालयाची सेवा कोलमडून पडेल, असे म्हणत आता इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रनेही याला विरोध केला आहे. हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - कोयना धरण १०० टक्के भरले; सिंचन, वीजनिर्मितीसह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली
हा निर्णय अत्यंत चुकीचा असून यामुळे खासगी रुग्णालये अडचणीत येण्याची शक्यता डॉ. भोंडवे यांनी व्यक्त केली आहे. खासगी रुग्णालयातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित असलेल्या आणि नसलेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी रुग्णालयांनाही अपुऱ्या मनुष्यबळाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशात त्यांच्या अडचणी आणखी वाढवण्याचेच काम या निर्णयामुळे होणार असल्याचेही डॉ भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे.आयएमए पेण शाखेने उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून नाराजी कळवली आहे. तर, या निर्णयामुळे खासगी रुग्णालये बंद पडतील आणि मग सर्व भार सरकारी रुग्णालयावर पडेल, असेही पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
..तर परिचारिका नोकरी सोडतील?
खासगी रुग्णालयातील परिचारिकांना या मोहिमेत सहभागी करत त्यांना ठिकठिकाणी जाऊन नागरिकांची-संशयित रुग्णांची तपासणी करण्याला परिचारिकांनीही विरोध केला आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही नोकरी सोडून देऊ, असा पवित्रा या परिचारिकांनी घेतला आहे. अशावेळी हाच निर्णय पेणसह इतर ठिकाणीही लागू झाला तर, खासगी रुग्णालये जवळजवळ बंदच पडतील, अशी भीती ही डॉ. भोंडवे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांची परिस्थिती भक्कम; पाण्याची चिंता मिटली