मुंबई - मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या मरिन ड्राईव्हवर नागरिकांची गर्दी असते. लॉकडाऊनमधून शिथिलता दिल्यावर फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जावे यासाठी मुंबई पोलिसांच्या मदतीला सीआयएसएफची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ आणि सीआयएसएफचे अक्षय उपाध्याय यांनी दिली.
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडू नका असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र आता मुंबईची परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने मॉर्निंग वॉकवर असलेली बंदी उठवलेली आहे. मुंबईत जॉगिंग आणि मॉर्निंग वॉकसाठी प्रसिद्ध असलेल्या मरिन ड्राईव्हवर नागरिकांची नेहमीच गर्दी असते.
आता जॉगिंग आणि मॉर्निंग वॉकला परवानगी दिल्याने या ठिकाणी पुन्हा गर्दी होईल. या गर्दीमधून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी सेन्ट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच सीआयएसएफची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईकरांना जॉगिंग आणि मॉर्निंग वॉकसाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मरिन ड्राईव्हवर नागरिकांची गर्दी होईल. यामुळे नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावे, मास्क घालावे, गर्दी करू नये तसेच कठड्यावर बसून राहू नये, याबाबत जनजागृती करणार असल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ आणि सीआयएसएफचे अक्षय उपाध्याय यांनी दिली.