मुंबई - एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान सहकार्य न केल्याने एपीआय सचिन वाझे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. सीआययूमध्ये वाझे यांचे सहयोगी असलेले एपीआय रियाज काझी हे माफीचा साक्षीदार बनणार आहेत.
रियाज काझी हे सीआययूमध्ये सचिन वाझे यांचे अगदी जवळचे मानले जात होते. याशिवाय अँटिलीया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाच्या चौकशीत ते सहयोगी अधिकारी होते. याशिवाय रियाझ काझी यांना सचिन वाझे यांनी तयार केलेल्या वाहनांची नंबर प्लेटही मिळाली होती. एवढेच नव्हे तर वाझेंच्या सांगण्यानुसार ठाणे साकेत सोसायटीच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजही रियाझ काझी यांनी घेतले होते. तर रियाझ काझी यांना अंबानींच्या घराजवळ स्फोटके ठेवण्यापासून ते मनसुखची हत्या करण्यापर्यंतच्या घटनांची माहिती आहे. म्हणूनच, काझी माफीचा साक्षीदार बनल्यामुळे सचिन वाझे यांचा खेळ संपल्याची चर्चा आहे.
एनआयएने केली रियाझची चौकशी-
सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने त्वरित रियाज काझीची चौकशी सुरू केली. रियाझ यांना सलग तीन दिवस चौकशीसाठी बोलविण्यात आले. या तीन दिवसांत रियाज काझीची सुमारे 10-10 तास चौकशी केली गेली. मात्र, त्याला गुरुवारी चौकशीसाठी बोलविण्यात आले नाही. आतापर्यंत झालेल्या चौकशीत रियाझ काझी यांनी आपले निवेदन नोंदविले आहे. ज्यात सचिन वाझे यांच्या सांगण्यावरूनच त्याने सर्व घटना घडवून आणल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा- फडणवीस सरकारमध्ये आरएसएसचा किती वाटा होता; नाना पटोलेंचा पलटवार