मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे महानगरपालिका क्षेत्रात पाचवे सेरो सर्वेक्षण अर्थात रक्त नमुन्यांची चाचणी करुन अँटीबॉडीज शोधण्याबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणानुसार एकूण ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीजचे अस्तित्व दिसून आले आहे. कोविड लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी अँटीबॉडीज विकसित झालेल्यांची संख्या ९०.२६ टक्के तर लसीकरण न झालेल्यांपैकी ७९.८६ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळली आहेत. विशेष म्हणजे, मागील सर्वेक्षणांच्या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये देखील अँटीबॉडीज विकसित होण्याचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्षही यातून समोर आला आहे.
- पाचवे सेरो सर्वेक्षण -
कोरोना विषाणूचा प्रसार किती नागरिकांमध्ये होऊन गेला आहे ते शोधण्यासाठी सेरो सर्व्हेक्षण करण्यात येते. मुंबईत आतापर्यंत तीन वेळा सेरो सर्वेक्षण करण्यात आले. एक वेळा लहान मुलांचे सेरो सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रक्त नमुने विषयक सर्वेक्षण करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक १२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये महानगरपालिकेने पाचवे सेरो सर्वेक्षण राबवले. त्यातील निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय यांच्या वतीने आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन व आयडीएफसी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहकार्याने हे पाचवे सेरो सर्वेक्षण राबविण्यात आले. शास्त्रोक्तरित्या रँडम पद्धतीचा वापर करून, वय वर्ष १८ पेक्षा अधिक असलेल्या नागरिकांमध्ये हे सेरो सर्वेक्षण केले आहे. महानगरपालिकेचे दवाखाने तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या विविध समाज घटकातील रुग्णांचा यामध्ये समावेश होता. अशा रितीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ प्रशासकीय विभागात मिळून एकूण ८ हजार ६७४ नागरिकांचे रक्त नमुने संकलित करुन त्याची चाचणी करण्यात आली. सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची माहिती नोंदविण्यासाठी मोबाईल अॅप्लीकेशनचा उपयोग करण्यात आला तसेच सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची संमती देखील घेण्यात आली.
हेही वाचा - मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात २ कोटी नागरिकांचे लसीकरण!
- बिगर झोपडपट्टी परिसरात अँटीबॉडीज असणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले -
मागील सेरो सर्वेक्षणांच्या तुलनेत विचार करता, मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभाग मिळून, झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरामध्ये अँटीबॉडीज अस्तित्व असणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे यांची तुलना करता दोन्ही भागांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. त्यामध्ये लक्षणीय असा फरक आढळलेला नाही. पाचव्या सेरो सर्वेक्षणानुसार, झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्ये जवळपास सारख्याच संख्येने अँटीबॉडीज आढळून आली आहेत. दोन्ही परिसरांतील आकड्यांमध्ये दिसणारा फरक हा नगण्य आहे. त्याचप्रमाणे, पुरुष व महिलांमध्ये देखील दिसलेली सेरो सकारात्मकता पाहता या दोन्ही गटातील सेरो अस्तित्वाच्या आकड्यांमध्येही किंचितसा फरक आहे. कोविड लसीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत लसीचा एक किंवा दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये अँटीबॉडीज हे लक्षणीयरित्या अधिक आढळले आहेत.
- पाचव्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष -
१. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील या सर्वेक्षणात केलेल्या चाचण्यांपैकी एकूण ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये सेरो सकारात्मकता अर्थात अँटीबॉडीज आहेत. यामध्ये झोपडपट्टी परिसरांमध्ये सुमारे ८७.०२ टक्के तर बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे ८६.२२ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीजआहेत.
२. सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार पुरुषांमध्ये ८५.०७ टक्के इतकी तर महिलांमध्ये ८८.२९ टक्के इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली.
३. सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी सुमारे ६५ टक्के नागरिकांनी कोविड लस घेतली असून उर्वरित ३५ टक्के नागरिकांनी कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही.
४. लस घेतलेल्या नागरिकांचा विचार करता, सुमारे ९०.२६ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झालेली आहेत.
५. ज्यांनी कोविड लस घेतलेली नाही अशा नागरिकांपैकी सुमारे ७९.८६ टक्के नागरिकांमध्येही अँटीबॉडीज विकसित झाल्याचे दिसून आले.
६. सर्वेक्षणात घेतलेल्या नमुन्यांपैकी सुमारे २० टक्के हे आरोग्य कर्मचाऱयांचे होते. त्याचा विचार करता, या गटामध्ये अँटीबॉडीज असण्याचे प्रमाण हे ८७.१४ टक्के इतके आहे.
७. विविध वयोगटांचा विचार करता, ८० ते ९१ टक्के दरम्यान सेरो-सकारात्मकता / अँटीबॉडीज अस्तित्व आढळून आले आहे.
हेही वाचा - गणेश विसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार - अजित पवार