मुंबई - ठाणे तसेच नवी मुंबई परिसरातील व्यावसायिकांची वैयक्तिक माहिती व मोबाईल क्रमांक कुख्यात गुंड सुरेश पुजारीला देणाऱ्या हस्तकाला शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. रवींद्र पुजारी (वय-35), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून संबंधित माहिती व्यवसायिकांकडून खंडणी उकळण्यासाठी पुरवण्यात येत असल्याचा खुलासा तपासादरम्यान झाला आहे.
नवी मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाला गेल्या काही दिवसांपासून परदेशात फरार झालेल्या गँगस्टर सुरेश पुजारीकडून दिवाळी भेट म्हणून तब्बल 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी होत होती. पीडित तक्रारदाराच्या क्रमांकावर सतत सुरेश पुजारीकडून खंडणीसाठी धमक्या येत होत्या. दिवाळीची भेट म्हणून आमच्या माणसाकडे 10 लाख रुपये न दिल्यास कुटुंबाच्या जीवावर बेतू शकते, अशा आशायाचे फोन येत होते.
सुरुवातीला तक्रारदाराने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करुन स्वतःचा मोबाईल क्रमांक बदलला होता. मात्र, पुन्हा नवीन क्रमांकावर धमकीचे फोन येऊ लागल्याने पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर तक्रारदाराच्या ओळखीतील व्यक्तीच संबंधित माहिती पुरवत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी रवींद्र पुजारीला कामोठे परिसरातील त्याच्या राहत्या घरातून अटक केली.
या आरोपीने आतापर्यंत मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील 22 व्यावसायिकांची माहिती गँगस्टर सुरेश पुजारीला खंडणीसाठी पुरवल्याची माहिती तपासातून समोर आली असून, खंडणी विरोधी पथक अधिक तपास करत आहे.