मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात सेना भाजपामध्ये राडे झाले. त्या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की महाराष्ट्रात शिवसेना भाजप हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत, आणि ते जनतेमध्ये चर्चेत राहण्यासाठी एकमेकांवर टीका करतात. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एका ताटात जेवतील,असा टोलाही त्यांनी यावेळी सेना-भाजपाला लगावला आहे. ते मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध राणे यांच्यातील वादामुळे महाराष्ट्राचे राजकारण गरम झाले आहे. ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे ऱाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक, जामीन असे अनेक नाट्य घडले होते. शिवसेना विरुद्ध राणे सामना रंगला आहे. त्याचदरम्यान, तोगडीया यांनी देखील या घटनेचा समाचार घेतला आहे. भविष्यात हे दोन्ही नेते एकत्र येतील असे सांगितले. हे राजकारण आहे. यात काहीही होऊ शकते. आज भाजपा-शिवसेना जरी विरोधात असले तरी ते उद्या एका ताटात जेवतील, यांचे हे सुरुच राहील. हे कधी भांडतील तर कधी एकमेकांच्या गळ्यात पडतील सांगता येत नसल्याचीही टीका तोगडीया यांनी केली आहे.
तालिबानी भारतीयांसाठी धोकादायक, अफगाणींना पोसू नका-
भारतातील दारुल ए उलेमा, गजवा ए हिंद सारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी भारत सरकारकडे केली आहे. तालिबान सोबत कसलीही चर्चा करू नये. तालिबानचा भारताला मोठा धोका आहे. भारतात तालिबानी विचारधारेचे केंद्र आहे. तसेच जे शरणार्थी अफगाणिस्तानातून भारतात आले आहेत, त्यांची पिढी उद्या पोलिसांना मारतील असे उदाहरण फ्रान्समध्ये बघायला मिळाले होते असेही यावेळी तोगडिया यांनी सांगितले.