मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग ईडी कार्यालयात आले होते. एकंदरीतच न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वकील आपल्या अशीलाची भेट घेऊ शकतो. याच अनुषंगाने इंद्रपाल सिंग हे अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी आले होते. शिवाय न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी दरम्यान ते उपस्थित होते.
उच्च न्यायालयाने पीएमएलए न्यायालयाचा हा निर्णय रद्द ठरवत अनिल देशमुखांची रवानगी १४ दिवसांच्या ईडी कोठडीत केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले आहेत. सीबीआय आणि ईडीने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. ईडीने पाच वेळा समन्स बजावून देखील अनिल देशमुख आले नव्हते. अनिल देशमुख यांच्याकडून कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येत होते. त्या दरम्यान ते अज्ञातवासात होते. अखेर चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.
शनिवारी विशेष न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावली होती
अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. देशमुख यांना शनिवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने नकार देत देशमुख यांना 14 दिवसासाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने देशमुख यांना दिलासा देत घरचे जेवण, औषधे आणि वकिलांना भेटण्याची मुभा दिली आहे. देशमुख यांच्यावतीने अॅड. अनिकेत उज्वल निकम आणि विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली होती.
12 नोव्हेंबरपर्यंत कोठडी
यानिर्णयाच्या विराेधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनवाई करत न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांचे वकील अॅड. अनिकेत निकम यांनी सांगितले की, ईडीने उच्च न्यायालयात स्पेशल कोर्टाने दिलेल्या निर्णायाविरोधात अपील केली होती. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही नेहमीच ईडीला सहकार्य केले आहे असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - क्रुझ ड्रग्ज प्रकरण शेवटापर्यंत नेण्याचा शरद पवारांनी दिला सल्ला- नवाब मलिक