मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने जोरदार धक्का दिला आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. शंभर करोड रुपये वसुली प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या अगोदर अनिल देशमुख यांच्या दोन निकटवर्तीयांना देखील याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
वरळीतील घर आणि उरणमधील जमिनीचा समावेश -
ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये वरळी इथला देशमुख यांच्या घराचा आणि उरण इथल्या जमिनीचा समावेश आहे. सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली होती. या बदलीनंतर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये अनिल देशमुख यांच्यावर शंभर करोड रुपये वसुलीचे आरोप लावण्यात आले होते. या लेटर बॉम्बनंतर अनिल देशमुख यांचं गृहमंत्री पद देखील गेलं होतं. संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या ताब्यात घेतला असून आता कारवाई सुद्धा सुरू केली आहे.