मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने काही दिवसांपुर्वीच देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन नाकारला होता. (Anil Deshmukh application for bail in PMLA court ) त्यानंतर त्यांनी आता मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे.
अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र -
100 कोटी कथित प्रकरणात तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यानंतर गेल्या 78 दिवसांपासून अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांनादेखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.
ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही. मात्र, याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे, याकरिता ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचं टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.
वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहेत
या आरोपानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
हेही वाचा - राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, पाहा कुठे कुणाची लॉटरी..