मुंबई - शंभर कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात खांदे दुखीवर उपचारासाठी परवानगी मागितली आहे. त्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ईडी 4 मे रोजी उत्तर सादर करणार आहे. त्याच दिवशी सुनावणी होणार ( Anil Deshmukh Filed Application Pmla Court ) आहे.
अनिल देशमुख यांच्याकडून न्यायालयात सांगण्यात आले की, जे जे रुग्णालयात उपचारासाठी सुविधा ह्या अपुऱ्या आहेत. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली. जे जे रुग्णालयाकडून यावर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ, असे न्यायालयाने म्हटले आहे.
अनिल देशमुखांनी न्यायालयात खांदेदुखी असून ह्रदयविकाराची समस्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासंदर्भात ईडीने उत्तर देण्यास वेळ मागितली आहे. मात्र, घरचे जेवणासाठी विरोध नाही न्यायालयाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे ईडीने म्हटले. अनिल देशमुख यांच्या दोन्ही अर्जावर 4 मे रोजी पुढील सुनावणी निर्णय घेण्यात येईल. अनिल देशमुख यांच्या वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश जे जे रुग्णालयाला मुंबई सत्र न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण? - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांचे कथित वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र लिहून खळबळ उडवून दिली होती. परमबीर सिंग यांनी हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांना पाठवले होते. या पत्रात अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मधून दर महिन्याला शंभर कोटी रुपयाचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.