मुंबई - मुंबईच्या अंधेरी वर्सोवा येथील एका सिलिंडरच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. सिलिंडरचे स्फोट झाल्याने ही आग भडकली. या आगीवर सुमारे चार तासांनी म्हणजेच दुपारी 1.30 वाजता आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत 4 जण जखमी झाले असून दोघे 40 तर इतर दोघे 60 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चार जण जखमी -
अंधेरी पश्चिम वर्सोवा यारी रोड येथील अंजुमन स्कूल आणि काळसेकर हॉस्पिटलजवळ सिलिंडरचे गोडावून आहे. या गोडाऊनला सकाळी 9.43 वाजता आग लागली. गोडावूनमध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सिलिंडरचे स्फोट होताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन त्या ठिकाणाहून लोकांनी पळ काढला. आगीची माहिती देताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सकाळी 10.10 वाजता ही आग लेव्हल-2 ची घोषित करण्यात आली.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 फायर इंजिन आणि 7 जंबो टँकर दाखल झाले होते. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. दुपारी 1.30 वाजता या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आग विझवण्यासाठी सुमारे 4 तासांचा कालावधी लागला.
चार जण जखमी -
आगीच्या ठिकाणाहून 4 जणांना बाहेर काढून जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राकेश कडू (30 वर्ष), लक्ष्मण कुमावत (24 वर्ष) हे दोघे 40 टक्के भाजले आहेत तर मनजीत खान (20 वर्ष)
आणि मुकेश कुमावत (30 वर्ष) हे दोघे 60 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
महापौरांचे आवाहन -
दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे, की जर तुमच्या निवासस्थानाजवळ गँस सिलिंडरचा अवैध साठा करून ठेवला असेल तर प्रशासनाकडे लेखी तक्रार करा. आम्ही पुढच्या आठवड्यात अशा सर्व स्थळांना भेटी देणार आहोत. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल.