मुंबई - बनावट मॉडेलींग एजन्सीच्या नावाखाली चित्रपट जाहिरात व सिरीयल मध्ये काम मिळणार असल्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अश्विन दौडा उर्फ डॉक्टर ऋशी यास अटक केली आहे.
आर्थर रोड कारागृहात शिकला सायबर गुन्हे
पोलिसांनी या संदर्भात तपास केला असता अटक आरोपी अश्विन दौडाच्या विरोधात साकीनाका पोलीस ठाणे, आंबोली पोलीस ठाणे, ओशिवरा पोलीस ठाणे, एन एम जोशी मार्ग पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला या अगोदरही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे. आरोपी आर्थर रोड कारागृहात असताना अशा प्रकारचे सायबर गुन्हे कसे करावे याची माहिती त्यांने कारागृहातील इतर आरोपींकडून घेतली होती. हा आरोपी उच्चशिक्षित असून त्याने मुंबईतील एच आर कॉलेज व अमेरिकेतील टीएमटी बिझनेस स्कूल ,स्प्रिंग अमेरिका येथून शिक्षण घेतले आहे. किशोर नमित कपूर यांच्या ॲक्टींग स्कूल मधून अभिनयाचे शिक्षण घेतलेले असून जवळपास 10 वर्ष जाहिरात क्षेत्रांमध्ये त्याने काम केलेले आहे. एवढेच नाही तर अनेक मोठ्या ब्रँडच्या उत्पादनांच्या जाहिरातीत काम सुद्धा केले आहे. आरोपी सिंटा राईटर असोसिएशन ऑफ इंडियाचा सभासद असून अरमान फिल्मच्या नावाने तो 'ट्रान्स' नावाचा चित्रपट तयार करत होता. ट्रान्स हे नाव आरोपीने संरक्षित केलेले असून त्याच्या ट्रेलर करिता 25 लाख रुपये खर्च केलेला आहे. पण यामध्ये आणखी पैशाची गरज असल्यामुळे आरोपीने बनावट वेबसाइट तयार करून त्याद्वारे जाहिरात, चित्रपटांमध्ये काम देण्याच्या नावाखाली शेकडो लोकांची फसवणूक केली आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी हा गेल्या काही वर्षांपासून अशाप्रकारे लोकांची आर्थिक फसवणूक करून भारतातील विविध राज्यात राहून स्वतःचे ठिकाण बदलत होता. सदर अटक आरोपीने कडून 9 मोबाईल फोन, 40 पेक्षा अधिक सिमकार्ड चा वापर केल्याचा ही पोलिसांच्या तपासात समोर आलेला आहे. सदरचा फरार आरोपी हा खालापूर येथे येणार असल्याचे कळल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले होते.
हेही वाचा - जळगाव जिल्हा उद्योग केंद्रातील प्रकल्प अधिकारी 10 हजारांची लाच घेताना जाळ्यात