मुंबई - दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईच्या रस्त्यांवरील पडलेले खड्डे हा कळीचा विषय बनला आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकांमुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने देखील याबाबत आवाज उठवला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही हा मुद्दा घेतला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी हा मुद्दा हाती घेत सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
अमित यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रस्त्यांच्या स्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळं अगदी सर्वांचे कंबरडे मोडले आहे. पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय,' असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल,' असा विश्वासही अमित यांनी व्यक्त केला आहे.
42 हजार खड्डे भरल्याचा महापौरांचा दावा
रस्त्यांवरील खड्डे योग्य तांत्रिक पद्धतीने भरले गेले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक सामुग्रीचा पुरवठा झाला पाहिजे. त्या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही कुचराई होऊ नये. खड्डे बुजविताना वाहतूककोंडी होऊ नये यासाठी संध्याकाळनंतर कामे केली जातात. त्यावेळेस काहीजण त्यास अटकाव करत असून, मुंबईकरांचे हित लक्षात घेऊन त्यांनी हे थांबवावे, असे आवाहन महापौरांनी केले.मुंबईत 9 एप्रिलपासून खड्डे भरायला सुरू केले गेले. आतापर्यंत 42 हजार खड्डे भरल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
हेही वाचा - मोफत ‘मध्यान्ह भोजन’ योजनेतून बांधकाम मजूरांना मिळणार सकस आहार - मंत्री छगन भुजबळ