मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगात साजरी होतय. बाबासाहेबांचा अमुल्य असा पुस्तकांचा व वापरलेल्या वस्तुंचा ठेवा सिद्धार्थ महाविद्यालयात जपून ठेवलाय. हा ठेवा पाहण्यासाठी लाखो भीम अनुयायी येत असतात. मात्र यंदा कोरोनाचं सावट असल्याने भीम अनुयायी यंदा येऊ शकत नाहीत. याच अमुल्य ठेव्याचं दर्शन आपल्या सर्वांसाठी..
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ज्याने प्यायलं तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. ही सिंह गर्जना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. शिक्षणाला बाबासाहेबांनी नेहमीच अग्रस्थान दिले. विद्यार्थ्य़ांना शिकता यावे यासाठी बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
याच महाविद्यालयात 1946 पासून अनेक वस्तू तसेच पुस्तके जतन करुन ठेवली आहेत. विज्ञान, वाणिज्य, कला, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कायदे, पाली भाषा अशा अनेक विषयांवर भाष्य करणारी हजारो पुस्तके महाविद्यालयात आहेत.
बाबासाहेबब आंबेडकर ज्या खुर्चीत बसायचे ती खुर्ची देखील येथे जतन करुन ठेवली आहे. पुस्तकांच्या खोलीत आजही या ज्ञानसागराची ही वास्तू जशीच्या तशी आहे. दरवर्षी अनेक भीम अनुयायी या खुर्चीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने प्रत्येक जण घरातूनच बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतोय.
पुस्तकप्रेमी बाबासाहेब -
बाबासाहेब एकदा म्हणाले होते, 'तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल. तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल"
अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच पुस्तके ही देखील मानवाची मूलभूत गरज आहे असे बाबासाहेबांच्या या विचारातून स्पष्टपणे सांगतात. बाबासाहेब यांचे पुस्तकप्रेम अपार होतं. पुस्तकांची आवड ही त्यांची कधीही न संपणारी तृष्णा झाली आणि त्यांसोबतचे एक वेगळेच नाते निर्माण झाले. जणू त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनून त्यांच्या आयुष्यभर सोबती म्हणूनच राहिली. या गोष्टीमुळे त्यांची स्मरणशक्ती अफाट बनली होती.
पुस्कांसाठी बंगला बांधणारा महामानव -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महामानव आहेत ज्यांनी ग्रंथालयासाठी बंगला बांधला आणि त्यात जवळपास बावीस हजारांपेक्षाही जास्त पुस्तकांचा संग्रह केला होता. बाबासाहेब लहान असताना त्यांचे वडील रामजी बाबा हे बाबासाहेब यांच्यावर विशेष लक्ष देत असत. बाबासाहेबांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. बाबासाहेबांना हवी ती पुस्तके ते आणून देत. पुरेसे पैसे नसतील तेव्हा ते आपल्या मुलींकडे जाऊन पैसे आणून पुस्तके आणत असत, पण बाबासाहेबांच्या अभ्यासात ते कधीच खंड पडू देत नव्हते. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेत एका अस्पृश्य कुटुंबात दूरवर शिक्षणाचा कोणताही संबंध नसताना बाबासाहेबांच्या घरातील ही जागरूकता क्रांतिकारक होती.