मुंबई - राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर ( Tab Distrubute At Corporation School In Mumbai ) करण्यासाठी आता मुलांच्या हातात टॅब दिसणार आहे. प्रशिक्षण, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सूचना करणे, यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली असून त्याची सुरूवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gayakwad ) यांनी दिली.
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन -
राज्यात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तांत्रिक सहकार्यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली असल्याचे शाळेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. यासंबंधी मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा सदस्य रोहीत पवार, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, ॲमेझॉन इंडियाचे संचालक सलीम मेमन, पब्लिक पॉलिसीच्या स्मृती मिश्रा यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या मदतीसाठी अॅमेझॉनचा हात -
विद्यार्थ्यांना शिक्षणात तंत्रज्ञानाची मदत होण्यासाठी ॲमेझॉन सहकार्य करणार आहे. याअंतर्गत राज्यात ४८८ आदर्श शाळांमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण, संगणकशास्त्रातील कोडिंग लॅब, ॲमेझॉनच्या मुलींच्या शिष्यवृत्तीमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींचा समावेश करण्याची तयारी, सर्व शासकीय शाळांमधील शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, पुणे येथे सायन्स सिटीच्या उभारणीमध्ये तंत्रज्ञानाची मदत, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत २०२२ पासून तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मदत करणे, प्रशिक्षण देणे या कामी ॲमेझानचे सहकार्य लाभणार आहे.
पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब -
शालेय शिक्षण विभागामार्फत डिजिटाईज्ड वर्ग केले जाणार आहेत. यामध्येदेखील ॲमेझॉनच्या सहकार्याची सुरूवात म्हणून मुंबईच्या धारावीमधील महानगरपालिकेअंतर्गत शाळांमधील ७६९ विद्यार्थ्यांना टॅब दिले जाणार असून नियमित अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग करता येणार आहे. हिंदी माध्यमिक शाळा (संत कक्कया शाळा इमारत ) दादर, काळा किल्ला मराठी प्राथमिक शाळा, काळा किल्ला एमपीएस माध्यमिक, टी.सी.मनपा मराठी माध्यमिक शाळा, टी.सी.मनपा उर्दू माध्यमिक शाळा, टी.सी. मनपा इंग्रजी माध्यमिक या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात टॅबचे वितरण करण्यात आले.
हेही वाचा - Bharat Biotech Nasal Booster Dose : भारत बायोटेकच्या इंट्रानेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला DGCI ची परवानगी