मुंबई - गरिबांना, गरजूंनाा सहज व अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संकल्पेनतील ही योजना होती. दिवसागणिक पावणे दोन लाख मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देत होती. (Shiv Bhojan Thali scheme ) स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, हॉटेल चालक आदींना ही केंद्र चालवण्यासाठी देण्यात आली होती.
राज्य सरकारकडून त्यासाठी अनुदान देण्यात येत होते. ग्रामीण भागातील केंद्र चालकांना एका थाळीमागे ५० रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना ३५ रुपये अनुदान दिले जात होते. मात्र, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती देण्याचा धडका सुरु केला आहे. शिवभोजन थाळी योजनेचा देखील यात समावेश आहे.
शिवभोजन थाळीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी त्यामुळे या योजनेचा आढावा घेतण्यास सुरुवात केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यासंदर्भातील अहवाल मागवण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योजना चालू ठेवायची की बंद याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, सध्या तरी योजना गुंडाळण्याच्या हालचाली सरकारकडून सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.