उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेचे माजी नगरसेवक 2 वर्षांसाठी तडीपार
मुंबई : शिवसेना दसरा मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे (Shivsena Dussehra Melava) यांनी आपल्या भाषणादरम्यान उल्लेख केलेल्या नवी मुंबईतील निष्ठावंत शिवसैनिक तसेच माजी नगरसेवक एम. के. मढवी यांच्यावर नवी मुंबई पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. एम. के. मढवी यांना मुंबई उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. एम. के. मढवी यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने तडीपारची कारवाई केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. (Uddhav Thackeray)
काही दिवसांपूर्वी मढवी यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी 'दहा लाखांची खंडणी दे अन्यथा एन्काउंटर करेन', अशी धमकी देत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या पत्रकार परिषदेत आपल्यावर वेगवेगळे गुन्हे नोंदवले जात असून, माझ्या विरोधात महिलांना पुढे करत विनयभंगाच्या तक्रारी नोंदवल्या जात असल्याचेही मढवी म्हणाले होते. या पत्रकार परिषददेमध्ये मढवी यांनी आपल्या कुटुंबीयांसह सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.
---------------------------
पवई सायकल ट्रॅकच्या बांधकामाविरोधात न्यायालयात याचिका
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इको-सेन्सिटिव्ह झोनमधून पाइपलाइनच्या बाजूने जाणार्या एसजीएनपी आणि विहार तलावातून जाणारा रस्त्याचा पवई सायकल ट्रॅकच्या बांधकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याची सुनावणी केवळ 13 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालकांनी उच्च न्यायालयाला कळवले होते की, बांधकामाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे त्यांनी भारतीय वन कायदा, 1927 आणि वन्यजीव कायदा, 1972 च्या तरतुदींनुसार प्राथमिक गुन्हा अहवाल नोंदविला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेला पुढील बांधकाम करण्यापासून बंदी करण्यास सांगितले. उच्च न्यायालयाने मे महिन्यात पवई तलाव पाणलोट क्षेत्रात सायकल आणि जॉगिंग ट्रॅक बांधण्याच्या बीएमसीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बेकायदेशीर ठरवले होते. ते काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.
---------------------------
आता वर्षाच्या बाराही महिने घ्या कलिंगडाचे पीक; दोन नव्या वाणांचा शोध
नवी मुंबई : आरोग्यदायी कलिंगडाचे आता वर्षाच्या बाराही महिने पीक घेता येणार आहे. आरडोर सिडस या भारतीय कंपनीने कलिंगडाच्या नव्या दोन वाणांचा (बियाणे) शोध लावला आहे. विजय आणि विराट अशी नावे असलेल्या या वाणांच्या आधारे शेतकऱ्यांना आता उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यातही कलिंगडाचे उत्पादन घेता येणार आहे.
चवीला गोड, रंगाने लालबुंद आणि आकाराने मोठे असणारे हे कलिंगड जास्त काळ टिकून राहणारे अशी या कलिंगडांची वैशिष्ट्ये आहेत. नवी मुंबई एपीएमसी फळ बाजारात नुकताच या नव्या जातीच्या कलिंगडाचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी व्यापाऱ्यांनी या दोन जातींच्या कलिंगडाची लागवड करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.
---------------------------
बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक; टंकलेखकास कोर्टाचा दिलासा
मुंबई : सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला नियुक्तीपत्रे टाईप करून देणाऱ्या टंकलेखकाला सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. टंकलेखक हा मोबादला घेऊन काम करतो. त्यानुसार त्याने जर नियुक्तीपत्र किंवा ओळखपत्र टाईप करून दिले असेल तर तो गुन्हा कसा ठरू शकतो, असा सवाल करत न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, उत्पादन शुल्क विभाग तसेच ओएनजीसीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संदीप राऊतला जुलै महिन्यात अटक केली. त्याने बोगस नियुक्तीपत्रे आणि ओळखपत्रे मंत्रालयाजवळील झेरॉक्स सेंटरमध्ये बनवून घेतल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले. त्या आधारावर क्राईम ब्रँचने शोएबउल्ला सलाउल्ला पठाण या टंकलेखकला अटक केली. या प्रकरणी पठाणने सत्र न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी सुनावणी झाली.
---------------------------
डेंग्यू, मलेरिया निर्मूलन अभियान; घाण पसरविणाऱ्यांकडून 14 लाखांचा दंड वसूल
मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून डेंग्यू, मलेरिया आदी आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती स्थाने शोधून नष्ट केली जातात. गेल्या १० महिन्यात डेंगी आणि मलेरियाचा प्रसार करणाऱ्या एडिस डासांची एकूण ७३ हजार ५५ उत्पत्ती स्थाने पालिकेला आढळली. या प्रकरणी पालिकेने संबधितांकडून १४ लाख ९ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेत आता पालिकेने नागरिकांच्या सहभागासाठी पावले उचलली आहेत.
मुंबई महापालिकेने मलेरिया प्रसार करणाऱ्या एनोफिलीस डासांवर नियंत्रण करण्यासाठी गेल्या १० महिन्यात विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव अशा ४ लाख ७ हजार ७९७ ठिकाणी भेटी दिल्या आहेत. त्यात एकूण उत्पत्ती स्थानांपैकी ९ हजार ७३४ ठिकाणी मलेरिला पसरवणारे एनोफिलीस डास आढळले. डेंगी नियंत्रणाच्या कारवाईत पालिकेने पाण्याची पिंपे, टायर, ऑड आर्टिकल, पेट्री लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट याठिकाणी तपासणी केली. त्याठिकाणी डेंगी पसरवणाऱ्या एडिस डासांची एकूण ७३ हजार ५५ उत्पत्ती स्थाने पालिकेला आढळली. या कारवाईत दरम्यान पालिकेने छपरावरून तसेच विविध आवारातून १३ हजार ६९२ टायर्स काढले. ऑड आर्टिकल्स म्हणून ३ लाख ७४ हजार ५९६ आर्टिकल्स काढण्यात आले. पालिकेने सप्टेंबर अखेरीपर्यंत केलेल्या कारवाईत ११ हजार ४९२ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर ७८२ प्रकरणात पालिकेने दावे दाखल केले आहेत.
---------------------------
अखेर मुख्यमंत्री कमळासमोर झुकले - राष्ट्रवादी
मुंबई : स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे यांनी अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा देणे म्हणजे मुख्यमंत्री अखेर कमळापुढे झुकले, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. शिवसेनेतील बंडानंतर राज्यामध्ये होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक असून, शिंदे गटाने त्यांचा उमेदवार निवडणूकीच्या मैदानात का उतरवला नाही? असा सवालही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.
स्वतःला शिवसेनेचे खरे कैवारी म्हणणाऱ्यांनी निवडणूक रिंगणातून अंग काढून घेत पराभवाच्या भीतीने उमेदवारीची माळ भाजपच्या गळ्यात टाकली. ऋतुजा रमेश लटके यांचा मुंबई महापालिकेतील सेवेच्या राजीनामा हा देखील कोर्टाच्या वटहुकुमानंतर स्वीकारला जातो. एवढ्या दडपशाहीचे राजकारण शिंदे-फडणवीस सरकार करत आहे. महाराष्ट्रातील व देशातील भारतीय लोकशाहीवर व राज्यघटनेवर विश्वास ठेवणारी जनता हे पाहत असून या सर्वांचा निवडणुकींच्या माध्यमातून व कायद्याच्या माध्यमातून लवकरच निपटारा होईल असा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे.
---------------------------
पत्नीला छेडल्याच्या रागातून खुनी हल्ला
नवी मुंबई : पनवेल शहर परिसरात एकावर धारदार शस्त्राने वार करून आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. स्वप्नील स्वामी असे या आरोपीचे नाव आहे. स्वप्नीलने आपल्या पत्नीला छेडछाड केल्याच्या रागातून कमलाकर भगत याच्यावर चार वार केले असून भगत हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी वाशीतील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बाबतचे खरे कारण पोलीस ताब्यात असलेल्या स्वप्नील स्वामी याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भर बाजारात झालेल्या या खुनी हल्ल्याने पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
---------------------------
लाचखोर पीआय विरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) च्या मुंबई युनिटने मानखुर्द पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या एका पोलीस निरीक्षकाविरुद्ध लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्या विरोधात कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
किशोर खरात (४७) असे एसीबीने एफआयआर दाखल केलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी हा मानखुर्द येथील रहिवासी असून त्याच्यावर मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. एसीबीने आपल्या एफआयआरमध्ये आरोप केला आहे की, तक्रारदाराच्या विरोधात दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात कारवाई न करण्यासाठी पोलिस निरीक्षक खरात यांनी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती आणि यावर्षी ऑगस्टमध्ये 25,000 रुपये देखील स्वीकारले होते.
---------------------------
रुग्णालय विस्ताराची जागा खासगी विकासकाला; न्यायालयाने पालिकेला फटकारले
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध नायर रुग्णालयाच्या विस्तारासाठी राखीव असलेल्या जागा खासगी विकासकाला महापालिकेने दिली होती; मात्र अद्यापही ही जागा परत मिळाली नसल्याने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकावर सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले त्यांना प्रशासनाला फटकारले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला खडे बोल सुनावतानाच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धर्मशाळा बांधून देण्यासाठी एक महिन्याच्या आत रिकामा भूखंड नायर रुग्णालयाला देण्याचे आदेशही मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने दिले. रुग्णालयाच्या विस्तारासाठी असलेला भूखंड विकासकाकडून ताब्यात घेऊन रुग्णालयाला देण्याचे आदेश महानगरपालिकेला द्यावेत या मागणीसाठी इम्रान कुरेशी यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले. नायर रुग्णालयाच्या विस्तारासाठी तीन दशकांपूर्वी राखीव ठेवण्यात आलेला सुमारे 1 हजार 559 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड मुंबई महापालिकेने विकासकाला दिला होता.
---------------------------
राजधानीत कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्याही खाली; १०९३ रुग्ण आढळले
मुंबई : मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. सध्या हा प्रसार कमी झाला आहे. आज १७८ नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. गेले काही दिवस सक्रिय रुग्णांची संख्या हजारच्या खाली होती. मात्र आज १०९३ सक्रिय रुग्ण असल्याची नोंद झाली आहे.
कोरोनाचे १७८ नवे रुग्ण : मुंबईत आज १४ ऑक्टोबरला ६७१४ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १७८ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. १३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ५१ हजार १३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३१ हजार ३०२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०९३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५६९७ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१२ टक्के इतका आहे.
---------------------------
तरच्या अटीवर राजीनामे मंजूर होत नसतात - खासदार, मनोज कोटक
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आज उमेदवारी अर्जही दाखल केला. परंतु ही उमेदवारी देण्यावरून मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या ऋतुजा लटके यांचा सहाय्यक लिपिक पदाचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेला अखेर उच्च न्यायालयाने फटकारल्यावर स्वीकारावा लागला.
या सर्व घडामोडींवरून भाजप तसेच बाळासाहेब यांची शिवसेना अर्थात शिंदे गट यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या टिकेवरून बोलताना भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी असे सांगितले आहे की, जर-तर ची भाषा जर राजीनाम्यामध्ये वापरली गेली असेल तर तो लगेच मंजूर होत नाही. ऋतुजा लटके यांनी जर-तर च्या भाषेत राजीनामा सुपूर्द केला होता. म्हणून या प्रक्रियेला उशीर लागला. आमच्यावर कुठलेही ताशेरे ओढले गेलेले नाही आहेत. या सर्व विषयांवर भाजप खासदार, मनोज कोटक यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
---------------------------
मुंबईत 81 नव्या कुष्ठरोग्यांची नोंद; 2030 पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दीष्ट
मुंबई : मुंबई कुष्ठरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवत राज्य सरकार व मुंबई महापालिकेने कुष्ठरोग रुग्णांची शोध मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमअंतर्गत तपासणी दरम्यान मुंबईत नवे ८१ कुष्ठरोग झालेले रुग्ण समोर आले आहेत. सन २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
कुष्ठरोगाचे निदान - मुंबईत कुष्ठरोग निर्मूलनासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागाने २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान शोध मोहिम हाती घेतली होती. या शोध मोहिमेत तब्बल ३२ लाख ७४ हजार ८८ जणांची तपासणी केली असता ८५०९ संशयीत आढळले असून त्यापैकी ८१ जणांना कुष्ठरोगाचे निदान झाले आहे. दरम्यान, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
---------------------------
मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना फटकारले; जाणून घ्या काय आहे प्रकरण...
मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये इमारतीमध्ये रहिवाशांना कुठलेही प्रकारचे रहिवासी दाखला न देता राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या विरोधात अर्थ या स्वयंसेवी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. येथील प्रकल्पातील 68 फाईलांच्या सविस्तर तपासणीला विरोध करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. यावर न्यायालयाने राज्य सरकारला आपली भूमिका मांडण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या 68 फायलींच्या संयुक्त तपासणीला विरोध करणारे किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने म्हटले की, याचिककर्त्यांच्या तक्रारीला तुमचा विरोध आहे ना ? पण प्रकल्पात अनियमितता झाल्याचे आमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही याप्रकरणी स्वतःहून याचिका दाखल केली आणि या प्रकल्पाच्या फायली एकत्रित पाहण्याचे आदेश दिल्यास तुमचा आक्षेप का ? असा संतप्त प्रश्न न्यायालयाने सोमय्या यांना विचारला. त्यानंतर सोमय्या यांनी पाहणीस आक्षेप नसल्याचे सांगितले.
काय आहे प्रकरण?
पालिकेच्या जागांवर हे 68 झोपू प्रकल्प प्रस्तावित आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांत विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे बऱ्याच प्रकल्पांना काम थांबवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. असे असतानाही त्यांच्या फायली झोपू प्राधिकरणाकडे पाठवण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेनुसार गृहनिर्माण मंत्र्यांनी पालिकेच्या जागेवरील 68 झोपु प्रकल्पांच्या फायलींची संयुक्त तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र 13 ऑक्टोबर 2020 रोजी झोपु प्राधिकरणाने ही तपासणी रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे केली. या मागणीमागील कारण पत्रात नमूद करण्यात आले नव्हते. हा निर्णय रद्दबातल ठरवण्याची आणि झोपु प्राधिकरणाला संयुक्त तपासणीचे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सोमय्या यांच्या पत्राच्या आधारे झोपु प्राधिकरणाने हा निर्णय घेतल्याचा व संयुक्त तपासणीला विरोध करणारे पत्र सोमय्या यांनी प्राधिकरणाच्या मुख्य अधिकाऱ्यांना लिहिल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
---------------------------
काळ रात्र होता होता, उश:काल झाला, अरे शिवसैनिकांनो.....
मुंबई : काळ रात्र होता होता उश:काल झाला . अरे पुन्हा शिवसैनिकांनो पेटवा मशाली. आपल्या पक्षाला "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" हे नाव मिळाले आहे. खरी लढाई पहिली जिंकली. आता शिवसैनिकांनो, आयुष्याच्या मशाल हे चिन्ह घराघरात पोहचवा. ज्यांनी पक्षात काळ रात्र करण्याचे ठरवली तो उशकाल सुरू झाला आहे. 'पेटवा आयुष्याच्या मशाली' असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
---------------------------
भुजबळ यांनी केल्या मशाल चिन्हाच्या आठवणी ताज्या
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने धगधगती मशाल ही निशाणी दिली आहे; मात्र शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात देखील विधानसभा निवडणुका वेळी छगन भुजबळ यांना निवडणुकीसाठी मशाल चिन्ह मिळालं होतं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या आठवणी ताज्या केल्या असून, त्यावेळी शिवसेनेने नेमकी मशाल या चिन्हावर पहिला उमेदवार कसा निवडून आला. याच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना संघटनेची निर्मिती झाली. यावेळी मुंबई महाराष्ट्रातील शेकडो तरुण या संघटनेची जोडले गेले. मात्र शिवसेनेची सुरुवात झाली त्यावेळेस खुद्द बाळासाहेब ठाकरे आणि जोडल्या गेलेल्या शेकडो शिवसैनिकांना कधीही वाटलं नव्हतं की, त्यांना राजकीय पक्ष म्हणून कधी निवडणुका लढवाव्या लागतील. मात्र 1978 नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवार उभे केले यावेळी पक्षाकडे चिन्ह नव्हतं. अशा वेळेस वेगवेगळ्या निशाण्यांवर शिवसेनेचे उमेदवार लढले. मात्र त्यावेळी आपल्याला मशाल हे चिन्ह मिळालं होतं. या चिन्हावरून शिवसेनेकडून पहिल्यांदा आपण निवडून आलो. त्या निवडणुकीमध्ये इतर सर्व उमेदवार हरले. मात्र मशाल या निशाणीवर आपल्याला यश मिळालं होतं. त्यानंतर झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही बाळासाहेब ठाकरे यांनी मशाल हेच चिन्ह उमेदवारांसाठी घेतलं होतं. त्यावेळी शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले मुंबई महानगरपालिकेवर सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना हा गणला गेला आणि मुंबई महानगरपालिकेवरही शिवसेनेची सत्ता आली होती. यावेळी बाळासाहेबांनी आपल्याला महापौर देखील बनवलं अशी आठवणी छगन भुजबळ यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली आहे.
---------------------------
बाळासाहेब म्हणून माझा फोटो वापरला तर, रॉयल्टी घेईन
मुंबई : एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीन्स तयार केले जात आहेत. अनेक ठिकाणी सोशल मीडियावर बाळासाहेब थोरात यांचा फोटो लावून "बाळासाहेबांची शिवसेना" असे मिश्किल टिप्पणी करण्यात येत आहे. या विषयावर प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने माझा फोटो वापरल्यास मी त्यांच्याकडून रॉयल्टी घेईन असा चिमटा थोरातांनी काढला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांची संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी हे मिस्टर टिप्पणी केली.
उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींना फोन : अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकी काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना यांना फोन करून त्यांचे आभार मानले असल्याची ही माहितीही बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
---------------------------
पत्नीवर कौटुंबिक अत्याचार, पण पती ठरला मूकदर्शक
मुंबई : सासरच्या कुटुंबीयांकडून होत असलेल्या अत्याचारानंतर पत्नीवर होत असलेल्या अत्याचार वेळेस पती केवळ प्रेक्षक म्हणून पहात होता, असे निरीक्षण नोंदवत कुटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात पतीने पत्नीला प्रति महिना 90 हजार रुपये देण्याचे निर्देश दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले आहे. कौटुंबिक हिंसाचारात पीडित पत्नीचे पती खाजगी गुंतवणूक वित्त फर्ममधील सहाय्यक उपाध्यक्षा या पदावर कार्यरत आहे. न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले आहे की, पीडित महिलेला या रकमेत 30,000 भाड्याचा खर्च म्हणून आणि इतर रक्कम पीडित महिला आणि त्यांची 10 वर्षांची मुलगी 2012 पासून छळामुळे नवरा आणि सासरच्या लोकांपासून दूर राहत होती. तसेच या रकमेचा काही भाग त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीच्या देखभालीसाठी 30,000 अनुशेषासह रक्कम भरावी लागणार आहे. असेही न्यायालयाने म्हटले आहे.
काय होते प्रकरण ?
35 वर्षीय महिला एका ज्वेलरी स्टोअरमध्ये काम करत होती; परंतु 2017 मध्ये तिची नोकरी गेली होती आणि ती स्वतःचा आणि त्यांच्या मुलीचा खर्च पाहण्यास असमर्थ होती. महिलेला कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागले होते असे सांगून न्यायालयाने 2009 च्या काही घटनांचा संदर्भ दिला. जेव्हा महिलेच्या सासरच्या लोकांनी तिच्यावर अत्याचार केले होते आणि तिचे पालक आणि तिचा नवरा फक्त प्रेक्षक होते. न्यायालयाने म्हटले की, अशा घटनांमध्ये पती हजर होता आणि एकतर गप्प बसला होता. हस्तक्षेप करण्यापूर्वी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ द्या किंवा तिच्यावर हल्ला केला. तो तिचा पती आहे आणि अशा परिस्थितीत आपल्या पत्नीचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य आहे असे त्यात म्हटले होते. परंतु त्याऐवजी तो गप्प राहिला आणि पत्नीला पाठिंबा देण्यासाठी विधायक पावले उचलली नाहीत. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत असे कृत्य कौटुंबिक हिंसाचार आहे असे त्यात म्हटले आहे. पत्नीने पतीच्या जीवनमानानुसार जगले पाहिजे असे नमूद करणे चुकीचे ठरू नये असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.व्ही. धुळधिले यांनी सांगितले. मुंबईत राहण्याचा खर्च खूप जास्त असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
---------------------------
प्रलंबित मागण्यांसाटी बेस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन
मुंबई : बेस्टमधील कंत्राटी चालकांच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली सोमवारी ओशिवरा आगारा नंतर मंगळवारी वडाळा डेपोमध्ये आंदोलन करण्यात आले. शिवाजी नगर आगारात बुधवारीही आंदोलन केले जाणार असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले होते.
या मागण्यांसाठी आंदोलन : बेस्टच्या कर्मचा-यांप्रमाणे समान काम करूनही समान वेतन व इतर सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे बेस्टच्या कायम कर्मचा-यांप्रमाणे या कामगारांनाही समान काम समान वेतन लागू करावे, आगामी काळात मुंबईकरांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा कमी केली किंवा दुस-या संस्थांना कंत्राट दिले तरी सध्याच्या कामगारांना काढू न टाकता नियमित करण्यात यावे; तसेच बेस्टच्या कर्मचा-यांप्रमाणे दिवाळीपूर्वी बोनस देण्यात यावा आदी मागण्या युनियनने केल्या आहेत.
या कंपन्यांचे कर्मचारी सहभागी : सोमवारपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात बेस्टसाठी काम करणाऱ्या हंसा सिटीबस सर्विसेस, टाटा मोटर्स प्रायव्हेट लि. या खासगी कंत्राटदारांचे कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बेस्टचे महाव्यवस्थापक, पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आल्याचे राव यांनी सांगितले.
---------------------------
भुजबळ हे वादळ; देशात पुन्हा एकदा मशाल पेटविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होईल
मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भुजबळ यांना विधानभवनात १९८५ साली पाहण्याचा योग आला. त्यांची सभागृहात एंट्री वादळी होती. त्यांनी विविध प्रश्नावर सभागृह गाजवत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यावेळी सभागृहात राम नाईक, दत्ता पाटिल, मृणाल गोरे असे अनेक तरुण आक्रमक चेहरे होते. पण भुजबळ त्यात वेगळे होते. १९९२ ला ते कॉंग्रेसमधे आले. १९९५ ला ते विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळी भुजबळ नावाच वादळ पहायला मिळाले. सरकारला धारेवर धरणारे भुजबळ सर्वत्र गाजले. १९९९ ला दोन्ही कॉंग्रेसची सत्ता येण्यास जे प्रमुख वक्ते होते. त्यात भुजबळ हे अग्रभागी होते. सत्ता येण्यास वरचा क्रमांक भुजबळांचा होता. त्यावेळेस दोन्ही कॉंग्रेसची आघाडी व्हावी यासाठी त्यांचा मोठा वाटा होता असे त्यांनी सांगितले. छगन भुजबळ यांच्या अमृतमोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भुजबळ वंचितांच्या हितासाठी लढणारे : यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले की, महाराष्ट्रासह देशातील दिनदलित वंचित व उपेक्षितांचे नेते व शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणारे छगन भुजबळ हे संघर्ष योध्दा आहेत. केवळ ओबीसींच नव्हे तर प्रत्येक समाजासाठी लढणारा योध्दा अशी भुजबळांची ओळख आहे. त्यांच्या ६१ चा सोहळा मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठ्या जनसमुदायासमोर झाला होता. आज छगन भुजबळांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलो आहेत. पुढे आपण त्यांची शंभरही साजरी करु असे त्यांनी यावेळी सांगितले.
---------------------------
कोमात गेलेल्या मुलीच्या वडिलांना मदतनिधी काढण्यास न्यायालयाची परवानगी
मुंबई : मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ निधी जेठमलानीला रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातानंतर कोमात गेलेल्या मुलीच्या वडिलांना या प्रकरणासाठी पश्चिम रेल्वेने उच्च न्यायालयात जमा केलेली 1.15 कोटी रुपये रक्कम काढण्याची मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ 28 मे 2017 रोजी रस्ता ओलांडत असताना निधी जेठमलानीला तेव्हा 17 वर्षांची होती. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियांत्रिकी सिग्नल कन्स्ट्रक्शनच्या वाहनाने धडक दिली. तेव्हापासून निधी कोमात आहे. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने निधी जेठमलानी यांना 69,92,156 रुपयांची भरपाई देण्याबाबत फेब्रुवारी 2021 रोजी दिलेल्या आदेशाला पश्चिम रेल्वेकडून आव्हान देण्यात आले. न्या. गौतम पटेल आणि न्या. गौरी गोडसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या आदेशाची प्रत मंगळवारी जाहीर करण्यात आली.
---------------------------
मंत्रालयात पांडुरंगाच्या वारीची प्रचिती - मुख्यमंत्री
मुंबई: मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि सामाजिक कार्यकर्ते, कलासंग्राहक परवेज दमानिया आणि रतन लुथ यांच्या संकल्पनेतून पंढरपूरच्या वारीतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाची आज सांगता झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. दरम्यान, मंत्रालयात पंढरीची वारीची प्रचिती आली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच पांडुरंगाच्या वारीचा अनुभव कथन केला.
तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनी : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळालेले छायाचित्रकार आणि पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनात केला होता. तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप झाला. आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेण्यास जातात. छायाचित्रकारांनी वारक-यांचा भाव आणि तेथील क्षणचित्रे टिपून संपूर्ण वारीचे दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून घडविले, असे मुख्यमंत्री म्हणाले. छायाचित्रकार शांतनू दास, महेश लोणकर,पुबारून बसू, मुकुंद पारके, सौरभ भाटीकर, डॉ. सावन गांधी, प्रणव देव, राहुल गोडसे, ज्ञानेश्वर वैद्य, प्रा. नितीन जोशी, दीपक भोसले, शिवम हरमलकर यांच्या छायाचित्रांचा या प्रदर्शनाने मन भरावून गेले असून त्यांचे अभिनंदन करणे क्रमप्राप्त असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
---------------------------
अल्पवयीन मुलीचा दुपट्टा ओढला; दोषीस तीन वर्षांचा कारावास
मुंबई : मुंबईतील एका अल्पवयीन मुलीचा दुपट्टा ओढून अश्लील चाळे केल्या प्रकरणी आरोपीला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉस्को न्यायालयाने तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. डिसेंबर 2017 मध्ये मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीचा युक्तिवाद फेटाळला : मुंबई सत्र न्यायालयामध्ये आरोपीच्या वतीने वकिलांकडून असा युक्तिवाद करण्यात आला होता की, पीडित मुलीने दिलेल्या साक्षीमध्ये दुपट्टा ओढला होता आणि कोर्टात त्याने तिचा स्कार्फ ओढल्याचे सांगितले होते. दुपट्टा आणि स्कार्फमध्ये फरक असल्याचा आरोपीचा युक्तिवाद फेटाळून लावत विशेष न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.