मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीसीवर बोलत असतात, ते देशाचा आढावा घेतात, अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी जर व्हीसी घेतली, तर त्यात काय बिघडते? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यात कोरोना आणि पुराचे संकट आले असतानाही आपल्या निवासस्थानावरूनच या विषयी माहिती घेतात. प्रत्यक्षात ते राज्यात फिरत नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता. याच संदर्भात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
'दररोज मुख्यमंत्री तीन ते चार व्हीसी घेतात, चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. काही त्रुटी राहिली तर आम्हाला लक्षात आणून द्या. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू पण संकटाच्या काळात सर्वांनी मिळून एकत्र काम करू. काल मराठवाड्यातील वैद्यकीय प्रवेशाच्या ७०: ३० च्या मुद्यावर विरोधक पायरीवर बसले होते, मी लगेच त्यावर मार्ग काढला' याची जाणीव करुन देत पवार पुढे म्हणाले, 'आम्ही बोलणार नव्हतो, पण विरोधक आमचेच खरे म्हणत असल्यानं मला बोलावं लागलं. कोरोनाचे इतके मोठे संकट असताना प्रत्येक नागरिकांना मदत करण्यात आली. बांधकाम मजुरांना प्रत्येकी पाच हजार, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना यांना मदत दिली. कोरोना येण्यापूर्वी आणि नंतरही शेतकऱ्यांना मदत केली. महाराष्ट्र कोविडसाठी कितीही पैसे लागले तरी सरकार कमी पडू देणार नाही.आणखी काही कमतरता लागली तर तेही देऊ', असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
देश पातळीवर जे ऑक्सिजन तयार होते, त्यात ८५ टक्के इंडस्ट्रीकडे जाते. त्यातील अर्ध तरी नागरिकांना द्या, अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. मात्र पूर्वी केवळ १५ टक्के मिळत होते, आता २० टक्के मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कोकणात नैसर्गिक संकट आले, त्यात आम्ही तिप्पट मदत केली. कोल्हापूर, सांगली सातारा येथे पुर आला. आम्ही त्याच धर्तीवर विदर्भाला मदत केली असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले. आम्ही आज संकटात असताना केंद्र सरकारने आपला हात आखडता घेतला आहे. आम्हाला जीएसटी चा परतावा म्हणून २२ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने द्यायला हवे होते, परंतु ते दिले नाहीत. त्यासाठी केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. आज आम्हाला हे पैसे द्यायला हवे होते, ते दिले नाहीत. या पैशातूनच आपण पगार, मदत निधी आणि इतर उपक्रमांना पैसे देतो. पण केंद्राची भूमिका ही केवळ टोलवा टोलवीची असल्याचा आरोपही पवारांनी यावेळी केला आहे.
यानंतर पवारांनी मांडलेल्या २९ हजार ८४ कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्याची विरोधकांना विनंती केली. उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलायला उभे राहिले, मात्र सभापतींनी यापूर्वीच आपण बोललात असे सांगत त्यांना परवानगी दिली नाही. यामुळे आम्हाला पुन्हा बोलू दिले जात नसल्याचा दावा करत विरोधकांनी सभात्याग केला.
हेही वाचा - 'त्या' गाडीवर कमळ कशाला? NCB पथकाच्या गाडीवरुन नितीन राऊतांचा सवाल