मुंबई - 'ज्याला अयोध्येला जायचे आहे, त्याला ( Raj Thackeray Ayodhya Visit ) जाऊ द्या. भारतात कोणी कुठेही जाऊ शकतो. त्याचा इतका बोभाटा करायचे आवश्यकता नाही. आम्हीही शिर्डीला गेलो, पण बोभाटा केला नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व मराठी माणसांना एकत्र ठेवण्याचे काम केले. ते कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या रस्त्याने शिवसेना पुढे चालली आहे, असेही ते म्हणाले.
कोणीही सगळं सोडून जात नाही - भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'हरलो तर हिमालयात जाऊ', असे वक्तव्य केले होते. याबाबत बोलताना, निवडणुकीत 'कोणाचा जय तर कोणाचा पराजय होत असतो. त्यामुळे अशा वक्तव्यांना जास्त महत्व देण्याचे कारण नाही. कोणीही सगळं सोडून हिमालयात जाणार नाही, हे आपल्यालाही कळत', अशी खिल्लीही अजित पवार यांनी उडवली.
विकासासाठी आणि शांतीसाठी अयोध्येला - निवडणुकीनंतर पाच वर्षाच्या काळात कामे केली जातात. त्याचे उदघाटन आम्ही नेहमी करत असतो. मुंबईतील पाणी समुद्रात सोडण्याच्या मार्गावर दर्शक गॅलरी उभारण्यात आली आहे. अशाच काही दर्शक गॅलरी आणखी उभारणार आहोत. वाळकेश्वरला वॉकिंग ट्रॅक तयार करत आहोत. अयोध्या हा राजनीती नव्हे तर श्रद्धेचा मुद्दा आहे. यात राजकारण नको. राम मंदिराचा संघर्ष आता संपला आहे. कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यामुळे संघर्षही आता संपला आहे. आम्ही अयोध्याला देशाच्या विकासासाठी आणि शांतीसाठी आयोध्याला जाणार आहोत, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
विहंगम दृश्याचा अनुभव - स्वराज्यभूमी लगत गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला वाळकेश्वर मार्ग व कवीवर्य भा.रा. तांबे चौकालगत ही गॅलरी उभी करण्यात आली आहे. पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनीवर सुमारे 475 चौ.मि. आकाराचा ‘व्हिविंग डेक’ - दर्शक गॅलरी उभारण्यात आली आहे. या ठिकाणावरून अरबी समुद्राचे, गिरगांव चौपाटीचे व क्विन्स नेकलेस, अशी ओळख असणाऱ्या मरीन ड्राईव्हच्या विहंगम दृश्याचा अनुभव घेता येणार आहे. हा डेक समुद्राच्या लाटांची ऊंची, दाब आदी सर्व बाबींचा तांत्रिक दृष्टीकोन अभ्यास करुन त्याअनुरुप उभारण्यात आला आहे.
आनंद देणारा स्पॉट - यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मंत्रालयातून राजभवनाकडे जात असताना इथे या कोपऱ्यात स्वच्छता पाहायला मिळत नव्हती. या परिसराकडे दुर्लक्ष झाले होते. मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केलं. त्यातूनच इथं खूप चांगला स्पॉट उभा राहिला आहे. मुंबईकर किंवा बाहेरचे पर्यटक गिरगाव चौपाटीला येतात. त्यांना इथे या गॅलरीत आल्यावर नक्कीच खूप आनंद मिळेल. भरतीच्यावेळी आपण समुद्रात उभे आहोत, असा आनंद देणारा हा स्पॉट उभा राहिला आहे. चैत्यभूमीच्या मागेही अशीच सुंदर दर्शक गॅलरी उभी करण्यात आली. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून अनेक चांगली कामं मुंबईत सुरु आहेत,असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा - Ajit pawar : मोबाईल रिचार्ज प्रमाणे विजेसाठी प्रिपेड कार्ड आणण्याचा राज्य सरकारचा विचार - अजित पवार