मुंबई - महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज धक्कादायक वळण मिळाले. राज्यभरात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सत्तास्थापनेसाठी नवीन समीकरण जुळून येत असतानाच सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने या नाट्यात आणखी भर पडली. यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा काका पुतण्यामधील राजकीय मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
काहीच दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत काकांसाठी रडणारे अजित पवार अचानक व्हिलन झाल्याचे समोर आले. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांना अंधारात ठेऊन अजित पवारांनी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ हा काकांना दिलेला धोका असल्याचा सूर राष्ट्रवादीतून उमटत आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर अजित पवारांविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा याचे द्योतक मानावे लागेल.
संबंधित घटनाक्रम स्पष्ट होत असतानाच शरद पवार यांनी अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल अनभिज्ञ असल्याचे ट्वीट केले. तसेच हा त्यांचा वैयक्तित निर्णय असल्याचे पवार यांनी नमूद केले. त्यामुळे राष्ट्रवादीत पडलेली फूट चव्हाट्यावर आली. यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यासाठी तिन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत आम्ही एकत्र असल्याचे उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी सांगितले. यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा अधिकृतपणे विरोध असल्याचे स्पष्ट होते. तसेच भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांच्या शपथग्रहणावेळी उपस्थित असणारे काही आमदार या परिषदेत उपस्थित होते. ते देखील पुन्हा शरद पवार यांच्यासोबत आल्याने अजित पवारांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे, यावर शिक्कामोर्तब होते.
राष्ट्रवादीत याआधीही काका पुतण्यांमध्ये फूट पडल्याचे अनेकदा समोर आले. परंतु, प्रत्येक वेळी शदर पवारांना हे बंड शमवण्यात यश आल्याने अनेक बाबींवर पडदा पडला होता. आता सत्तेसाठी अजित पवार यांनी फक्त पक्षाची नाही, तर पवार कुटुंबीयांचीच साथ सोडल्याने पवारांमध्ये संघर्षाची परिस्थिती आहे.