मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी समुहाकडे येताच अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड ही कंपनी देशातील सर्वात मोठी एअरपोर्ट ऑपरेटर ठरली आहे. मात्र, मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा येताच अवघ्या काही दिवसांतच कंपनीने विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादमध्ये हलविले असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, या चर्चेला पूर्णविराम देण्याचे काम अदानी ग्रुपकडून करण्यात आले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्यालय हे मुंबईतच राहणार आहे. ते अहमदाबादला हलवण्याच्या केवळ अफवा आहेत, असे स्पष्टीकरण ट्विटरच्या माध्यमातून अदानी ग्रुपने दिले.
हेही वाचा - मुंबई पोलिसाची कर्तव्यदक्षता; पाण्यात अडकलेल्या मुलीला सुरक्षितस्थळी हलविलं
कार्यालय हलवण्याच्या चर्चेमुळे काँग्रेसने केली होती टीका
मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेले दांडीया नृत्य बरेच काही सांगून जाते. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेले. महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी जी.व्ही.के या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. जी.व्ही.केने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.
जीव्हीके कंपनीकडून ओव्हरटेक
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीके समुहाकडे होते. पण, जीव्हीके कंपनी आर्थिक अडचणीत सापडली होती. जीव्हीके कंपनीवर सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर झाला होता. परिणामी जीव्हीके कंपनीला विमानतळ व्यवस्थापन विक्री काढल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे, गेल्या वर्षी अदानी समुहाने मुंबई विमानतळ खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तसा करारसुद्धा करण्यात आला होता. जीव्हीके आणि अदानीमधील कराराला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला होता. इतर काही खात्यांकडून अद्याप यासाठी मंजुरी मिळणे बाकी होती. अखेर सर्व मान्यता मिळवून अदानी समुहाने जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा गेल्या काही दिवसांपूर्वी घेतला.
हेही वाचा - शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा