मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. मात्र महिनाभरातच ही लाट ओसरली आहे. यामुळे गेले काही दिवस झोपडपट्ट्यांमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही. आता मुंबईत सील इमारतींची संख्याही शून्यावर आली आहे. यामुळे मुंबईमधील झोपड्यानंतर इमारतीही कंटेनमेंट मुक्त झाल्या आहेत.
कोरोना आटोक्यात -
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोना विषाणूच्या तीन लाटा आल्या. त्यापैकी दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तर तिसरी लाट थोपवण्याचे काम सुरु आहे. डिसेंबर पासून सुरु झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६ ते ८ जानेवारीदरम्यान रोज २० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत असून सध्या ३०० ते ४०० रुग्ण दिवसाला आढळून येत आहेत.
झोपडपट्ट्या, इमारती कन्टेन्टमेंट मुक्त -
कोरोना रुग्ण आढळून आल्यास मुंबईत झोपडपट्ट्यामध्ये त्याचा प्रसार रोखण्यासाठी त्या कन्टेन्टमेंट झोन म्हणून सिल केल्या जातात. त्याच प्रमाणे एखाद्या इमारतीमध्ये पाच रुग्ण आढळून आल्यास इमारती सिल केल्या जात होत्या. तिसऱ्या लाटेत इमारतीमधील २० टक्के घरांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यास इमारती सिल केल्या जात होत्या. तिसऱ्या लाटेदरम्यान ६ जानेवारीला ३२ झोपडपट्ट्या आणि ५०८ इमारती कंटेनमेंट झोन म्हणून सील होत्या. १० जानेवारीला त्यात काही प्रमाणात घट होऊन ३० झोपडपट्ट्या आणि १६८ इमारती कंटेनमेंट झोन म्हणून सील होत्या. १२ जानेवारीला एकही झोपडपट्टी कंटेनमेंट झोन म्हणून सील नव्हती. त्यादिवशी ५६ इमारती सील होत्या. त्यानंतर सील इमारतींची संख्याही कमी झाली. १० फेब्रुवारीला मुंबईमधील सील इमारतींची संख्याही शून्यावर आली आहे. यामुळे मुंबईमधील झोपडपट्ट्यानंतर इमारतीही कन्टेन्टमेंट मुक्त झाल्या आहेत.
रुग्ण दुपटीचा कालावधी वाढतोय -
मुंबईत फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. १ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ५६४ दिवस इतका होता. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला १० ते ११ हजार रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या वाढू लागल्याने १ एप्रिलला रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ तर १८ एप्रिलला हा कालावधी ४५ दिवसांवर घसरून खाली आला होता. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने १ डिसेंबरला हा कालावधी २७८० दिवसांवर पोहचला होता. त्यानंतर तिसरी लाट सुरु झाली. ६ ते ८ जानेवारीदरम्यान रोज २० हजारावर रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या वाढल्याने ११ जानेवारीला रुग्ण दुपटीचा कालावधी ३६ दिवसांवर आला होता. १० फेब्रुवारीला हा कालावधी वाढून आता ९४९ दिवस इतका झाला आहे.
१० लाख ५३ हजार ४६ नागरिकांना कोरोना -
पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत १० फेब्रुवारी रोजी ४२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर २ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ८२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५३ हजार ४६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख २९ हजार ८३८ रुग्ण बरे झाले आहेत. १६ हजार ६७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ६९८ सक्रिय रुग्ण ( Active Cases In Mumbai ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९४९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा ( Corona Rate in Maharashtra ) दर ०.०७ टक्के इतका आहे.
रुग्ण कमी झाल्याने शून्य इमारती सिल -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ९० टक्के रुग्ण इमारतीमधील होते. हे रुग्ण घरातच राहून ४ ते ५ दिवसात बरे होत असल्याने त्यांना होम क्वारेंटाईन केले गेले. रुग्ण इतर लोकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून त्यांचे घर सिल केले जात होते. एकाच इमारतीमध्ये २० टक्के घरात रुग्ण आढळून आल्यास इमारती सिल केल्या जात होत्या. आता रुग्ण संख्या कमी झाल्यावर इमारती सिल करण्याचे प्रमाणही कमी होऊन शून्यावर आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.