मुंबई - मुंबईत एकूण १९४१.१६ किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यात शहर विभागात ५०६.४६ किलोमीटर, पश्चिम उपनगरात ९२०.६४ किलोमीटर व पूर्व उपनगरात ५०७.०६ किलोमीटरच्या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवर असलेली वाहतुकीची वर्दळ, सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून सातत्याने खोदण्यात येणारे चर, जलवाहिन्यांची गळती, पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे यामुळे रस्त्यांची दुरावस्था होते. मुंबईमध्ये बहुतेक ठिकाणी मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. असे असले तरी इतर ठिकाणी पालिकेने सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यास सुरुवात केली आहे. केबल आणि पाण्याच्या पाईपलाईन आदी सेवा देण्यासाठी रस्त्यांच्या बाजूला डक ठेवले जात आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. या दरम्यान रस्त्यावर खड्डे दिसायला नकोत अशा स्पष्ट सूचना पालिकेला दिल्या आहेत. यावेळी पालिकेकडून रस्ते काँक्रीटचे केले जात असून येत्या दोन वर्षात सर्व रस्ते काँक्रीटचे केले जातील अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती.
रस्त्यांसाठी ५८०० कोटींची टेंडर - आतापर्यंत पालिकेने २०२१-२२ मध्ये १९६ किमीचे रस्ते पूर्ण केले आहेत. त्यात, सीमेंट काँक्रीटचे रस्ते १६३.५७ किमी असून ३२.७७ किमी रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. २०२२-२३ मध्ये रस्त्याच्या काँक्रीटकरणाच्या कामासाठी पालिकेने ५ टेंडर काढली आहेत. ५८०० कोटींची ही टेंडर आहेत. ८०० ते १९०० कोटींची ही टेंडर आहेत. पालिकेच्या कामात मोठ्या कंपन्या सहभागी होत नव्हत्या. यासाठी नियमात बदल करण्यात आले आहेत. यामुळे मोठ्या कंपन्या सहभागी झाल्याने नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळतील असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. पालिकेने ९८९ किलोमिटर रस्ते काँक्रीटचे केले आहेत. सध्या २३६ किलोमीटरचे काम केले जाणार आहे. आणखी ४०० किलोमीटरचे काम केले जाणार आहे. मुंबईत गेल्या २० वर्षात २१ हजार कोटी रुपये खर्च करुन रस्ते तयार केले आहेत.
खड्डे बुजवण्यासाठी नवे तंत्रज्ञान - रस्त्यांवरील खड्डे कोल्डमिक्स तंत्रज्ञान वापरेल जात होते. मात्र, यामुळे पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने खड्डे होत होते. यासाठी पालिकेने रॅपिड हार्डनिंग काँक्रीट आणि जिओ पॉलिमर या दोन नवीन पद्धतींचा उपयोग करून रस्त्यांवरील खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे हे तिन्ही विभाग मिळून सुमारे ५ कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या एकूण पाच निविदा काढण्यात आल्या आहेत. कार्यादेश दिल्यापासून पुढील पंधरा महिने कालावधीसाठी या निविदाद्वारे कंत्राटदार नियुक्त केले जाणार आहे. खड्डे भरण्याचा पंधरा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यापुढील पंधरा महिने हमी कालावधी लागू राहणार आहे. विशेष म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर ५० टक्के तर हमी कालावधी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के रक्कम कंत्राटदारास दिली जाईल. तशी तरतूद या निविदांमध्ये करण्यात आली आहे. यामुळे खड्डे चांगल्या प्रकारे भरले जातील अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पि. वेलरासू यांनी दिली.
खड्ड्यांवर इतका खर्च - रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी २०२१ - २२ या आर्थिक वर्षात ४१.३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी ३८.४८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मागील वर्षी खड्ड्यांबाबत ४० हजार तक्रारी नोंद झाल्या होत्या. २०२२ - २३ मध्ये खड्डे बुजवण्यासाठी ५२ कोटी रुपयांची तरतूद काढण्यात आली आहे. पालिकेचे २४ वॉर्ड आहेत. प्रत्येकी वॉर्डला खड्डे भरण्यासाठी २ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यात ५० लाख खड्डयांच्या दुरुस्तीसाठी तर १.५० कोटी परिरक्षणासाठी देण्यात आले आहेत.