पुणे - गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहतीमध्ये सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या श्रीधर काळे यांचा मुलगा अॅड. रवी काळे यांनी प्रथमवर्ग न्यायाधीश पदाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि दिवस-रात्र अभ्यास करून त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. याविषयी ईटीव्ही भारतने त्यांच्याशी संवाद साधला आहे.
वडिलांकडून प्रेरणा - माझ्या आयुष्यामध्ये आयडियल कॅरेक्टर माझे वडील आहेत. तसेच माझे गुरु प्रताप परदेशी, गणेश शिरसाट सर, संतोष चव्हाण, श्रीनिवास मोरे यांचा माझ्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी मला चांगले पाठबळ दिले. त्यामुळे मी आज इथे पोहोचलो आहे. आम्ही पाच भावंडे आहोत. 2005 साली आमच्या आईचे निधन झाले. त्यानंतर आमच्या वडिलांनी आईची जागा घेऊन आम्हाला शिकवले. आमच्या पाचही जणांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वडिलांनी अपार कष्ट घेतले. वडिलांच्या सकारात्मक विचारांमुळे मी आज इथंपर्यंत पोहोचलो आहे. त्यांचे पाठबळ मला नेहमी राहिले.
प्रयत्नात सातत्य ठेवा - लॉकडाऊन सुरू झाल्यावर पंधरा पंधरा तास अभ्यास करायचो. यामुळे तरुणांना मी हेच सांगेन की तुम्ही जर एखादं ध्येय निश्चित केलं तर ते तडीस नेलं पाहिजे. त्यासाठी कधीही पाठलाग सोडू नका. त्यात सातत्य ठेवा, असा सल्ला रवी यांनी दिला आहे.
आम्ही शिकलो नाही, तुम्ही शिका - रवी काळे यांचे वडील श्रीधर काळे यांनी सांगितले की, मला माझ्या मुलाबद्दल प्रचंड अभिमान वाटतो. त्याने ज्या पद्धतीने अभ्यास केला, शिक्षण घेतले आणि पुढे गेला ही गोष्ट खूप आनंददायी आहे. माझ्या मोठ्या मुलीने सगळ्या मुलांकडून व्यवस्थित अभ्यास करून घेतला. त्यांना एकच ध्येय दिले की आम्ही स्वतः शिकलो नाही. मात्र तुम्ही शिका आणि मोठे व्हा!