मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात ( Silver Oak Attack ) आरोपी म्हणून अटकेत असलेल्या ऍड. गुणरत्न सदावर्ते ( Adv. Gunaratna Sadavarte ) यांची 18 दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली. या 18 दिवसांत त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं ?, पोलिसांची वागणूक त्यांच्यासोबत कशी होती ?, तुरुंगातील त्यांचा अनुभव कसा होता ? या सर्व मुद्द्यांवर सदावर्ते यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलत होते.
कैद्यांना शिकवला योगा - यावेळी सदावर्ते म्हणाले की, "मला तुरुंगात टाकण्यात आले. हा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णकाळ होता. जेलमध्ये मी एका पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले. तिथे एका पोलीस कर्मचाऱ्याला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मला थोडीफार माहिती असल्याने मी त्या कर्मचाऱ्यांच्या तोंडातली लाळ काढली, त्यांना ऑक्सिजन दिला आणि त्यांचा प्राण वाचला. या दिवसात मी तेथील कैद्यांसोबतही मिसळलो. मी एक योगा शिक्षक असल्याने कैद्यांना योगाही ( Yoga ) शिकवला, मेडिटेशन शिकवले ( Meditation )", असे सदावर्ते यांनी सांगितले.
मी तुरुंगातून होतो कर्मचाऱ्यांच्या संपर्कात - पुढे सदावर्ते म्हणाले, "इतकेच नाही तर या माझ्या सुवर्णकाळात मी आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्याही ( MSRTC Workers ) संपर्कात होतो. मी त्यांना सतत सूचना करत होतो. त्यांनी कधी कामावर रुजू व्हावे, कधी कुठले पाऊल टाकावे, अशा इतंबूत सूचना मी आमच्या कर्मचाऱ्यांना कारागृहातून देत होतो. सतत त्यांच्या संपर्कात होतो."
एकही कर्मचारी माझ्यावर नाराज नाही - दरम्यान, तुम्ही कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतलेत हे मान्य केले. त्यानंतर एसटी कर्मचारी खरंच नाराज आहेत का ?, असा प्रश्न सदावर्ते यांना विचारला असता ते म्हणाले की, "तुमची माहिती काहीतरी कमी पडत आहे. 80 टक्के कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी माझ्यावर नाराज नाही. आत्ताही सर्व माझ्या बाजूने आहेत. आम्ही सोबत आहोत. त्या कर्मचाऱ्यांनी मला त्यांचा विठ्ठल म्हणून उपमा दिली आहे. माझ्या घरात त्यांनी तशी फ्रेम मला भेट दिली आहे. हे कर्मचारी माझी साथ कशी सोडतील ?", असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.
पुन्हा एकदा डंके की चोट पे ? - "आम्ही माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत डंके की चोट पे लढू. आमचा खून झाला तरी आम्ही लढू. कारण, हा कर्मचाऱ्यांचा लढा आहे. त्यामुळे जोपर्यंत कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील", असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते १८ दिवसांनी तुरुंगाबाहेर; राज्य सरकारविरोधात आक्रमक