मुंबई - दादरा व नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील ग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. यानंतर यासंदर्भात चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 15 पानांची गुजराती भाषेत लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असून, त्यानुसार तपास सुरू असून मोहन डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यासह नऊ अधिकाऱ्यांची नाव पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलेली आहेत
हेही वाचा - सरकारविरोधात तरुणांची माथी भडकवून आगीत तेल ओतण्याचे बंद करा, राऊत यांचा विरोधकांना टोला
चौकशीसाठी परवानगीची गरज नाही-
यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा - नगर हवेलीच्या प्रशासकांच्या संदर्भात एसआयटीकडून चौकशी केली जात असताना कुठलीही विशिष्ट परवानगी घेणे आवश्यक आहे का? यावर उत्तर देताना ज्येष्ठ वकील अटल बिहारी दुबे यांच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात crpc च्या 306 , 506, 389, 120 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाला जर कोणाची चौकशी करायची असेल तर यामध्ये कुठल्याही परवानगीची गरज नाही. राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे, आणि दाखल करण्यात आलेला गुन्हा सीआरपीसीच्या अंतर्गत येत असल्यामुळे कुठल्याची अधिकारी किंवा प्रशासकाची चौकशी करण्यासाठी एसआयटी ही सक्षम आहे. मात्र, यानंतर न्यायालयामध्ये जर खटला चालवायचा असेल तर संबंधित व्यक्तीच्या विरोधात खटला चालवण्यासाठी रीतसर परवानगी संबंधित विभागाकडून घेणे गरजेचे असल्याचेही अॅड अटल बिहारी दुबे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - भाजप नेते डिस्टर्ब.. सुधीर मुनगंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवडीची होणार चौकशी - नाना पटोले
अभिनव डेलकर यांचे आरोप-
गेल्या एक वर्षापासून मोहन डेलकर हे प्रचंड तणावाखाली होते. दादरा व नगर हवेलीचे प्रशासन त्यांचा वारंवार छळ करत होते. त्यांना माणहानीकारक वागणूक देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मागचा हेतू म्हणजे मोहन डेलकर यांच्या कॉलेजवर नियंत्रण मिळविण्यासाठी व पुढील निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यासाठी जाणून बुजून त्रास दिला जात होता. हे सर्व दादरा -नगर हवेलीचे प्रशासन प्रफुल्ल खोडा पटेल यांच्या आदेशावरून करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे. डेलकर यांच्याविरोधात जाणून-बुजून कटकारस्थान केले जाऊन त्यांना नाहक त्रास दिला जात होता.
या अधिकाऱ्यांची आहेत नाव-
दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल, जिल्हाधिकारी संदीप सिंग, तत्कालीन पोलीस अधीक्षक शरद दराडे, उपजिल्हाधिकारी अपूर्व शर्मा, उपविभागीय अधिकारी मंदिरची जैन, पोलीस निरीक्षक मनोज पटेल, रोहित यादव, फतेहसिंह चोहाण, दिलीप पटेल या सर्वांनी मिळून मोहन डेलकर यांना त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत त्रास दिला असल्याचा आरोप डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी केला आहे. त्याबरोबरच मोहन डेलकर यांच्याकडे 25 कोटी रुपयांची मागणी करून खोट्या केसेस दाखल करून व इतर मार्गाने भीती दाखवून निवडणूक न लढवण्याचा करिता व कॉलेज वर असलेले नियंत्रण मिळवण्यासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ि
हेही वाचा - बच्चू कडूंनी लॉकडाऊन केला रद्द; अकोलेकरांना दिलासा