मुंबई - मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरासह उपनगरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु असलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या. मंत्रालयात प्रस्तावित कामाचा ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार सदा सरवणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासु, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते.
कमीत-कमी झाडे तोडावी - वरळी-शिवडी, नरीमन पॉईंट-कफ परेड या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ही कामे करताना नागरी सुविधा कमीत कमी बाधित होतील याची दक्षता घ्यावी, जेथे खोदकाम करावयाचे आहे तेथे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी. प्रकल्प बाधितांचे योग्य पुनर्वसन व्हावे, अत्यावश्यक असतील तेथेच आणि कमीत कमी झाडे तोडावीत, बाधित होणाऱ्या व्यक्तींना प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती द्यावी, असे निर्देश ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दक्षिण मुंबईतील वाहतुक कोंडी सुटणार - दक्षिण मुंबईकडे येताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरीमन पॉईंट ते कफ परेड यांना जोडणारा मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गाच्या प्रगतीचाही मंत्री ठाकरे यांनी आढावा घेतला. व्यावसायिक केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईतील या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होऊन वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून प्रस्तावित असणारा हा रस्ता नरीमन पॉईंट पासून कफ परेड कडे जाणाऱ्या प्रकाश पेठे मार्गापर्यंत उड्डाणपूल स्वरूपात असल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे. या प्रकल्पामुळे मच्छीमारांच्या दैनंदिन जीवनात बाधा येऊ नये यादृष्टीने त्यांच्यासमवेत पुन्हा एकदा चर्चा करून मार्गाच्या अंतिम मान्यतेसाठी सर्व संबंधित विभागांच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश मंत्री ठाकरे यांनी दिले.
मिठी नदी होणार प्रदूषणमुक्त - मिठी नदीचे प्रदूषण कमी करणे, नदीत कचरा टाकला जाऊ नये यासाठी जनजागृती करणे, नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी जाऊ नये यासाठी आवश्यक तेथे सुरक्षा भिंत बांधणे गरजेचे आहे. मिठी नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांच्यामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. शिवसेना आमदार दिलीप लांडे, सदा सरवणकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासु, पर्यावरणवादी अफरोज शाह यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.