मुंबई - मुंबईमध्ये डिसेंबरपासून कोरोना विषाणूची ( Corona Third Wave ) तिसरी लाट आली आहे. या लाटेदरम्यान जानेवारी महिन्यात तीन दिवस रोज २० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले होते. सध्या रुग्णसंख्येत घट होऊन पाच ते सहा हजाराच्या सुमारास रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्येत घट झाली तरी काहीवेळा रुग्णसंख्या वाढण्याची भीती असते. पुढील दोन ते तीन दिवसात रुग्णसंख्येत घट झाल्यास तिसरी लाट ओसरत असल्याचे सांगता येऊ शकते, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Commissioner Suresh Kakani ) यांनी दिली आहे.
- 'तीन ते चार दिवस महत्वाचे'
मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या कालावधीत कोरोना विषाणूच्या दोन लाटा येऊन गेल्या. नागरिकांची साथ आणि योग्य नियोजन यामुळे पालिकेला कोरोनाच्या दोन्ही लाटा आटोक्यात आणण्यात यश आले आहे. कोरोना आटोक्यात आला असताना डिसेंबर महिन्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ६ ते ८ जानेवारी दरम्यान सर्वाधिक म्हणजेच रोज २० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसात घट होऊन काल सोमवारी ५९५६ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या कमी होईल, असे टास्क फोर्सने म्हटले होते. मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. पुढील २ ते ३ दिवस रुग्णसंख्या वाढते कि कमी होते याचा आढावा घेतला जाईल. रुग्णसंख्या अशीच कमी होत राहील्यास मुंबईमधून तिसरी लाट ओसरत असल्याचे स्पष्ट होणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले. मुंबईत डेल्टा डेरिव्हेटीव्ह व्हेरियंटचे रुग्ण अधिक होते. मात्र तिसऱ्या लाटेपासून त्यात घट होऊन ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
- 'रुग्णसंख्या कमी झाल्यास शाळा सुरु करण्याची शिफारस'
मुंबईमध्ये जानेवारीच्या सुरुवातीला रुग्णसंख्या वाढली होती. पहिल्या दोन लाटांपेक्षा तिसऱ्या लाटेत जास्त रुग्ण आढळून आले. यामुळे सध्या सरकारने १५ फेब्रुवारीपर्यत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होत आहे. रुग्णसंख्या आणखी कमी होऊन ती आटोक्यात आल्यास मुंबईमधील परिस्थीची माहिती राज्याच्या टास्क फोर्स आणि सरकारला देऊन शाळा सुरु करण्याबाबत शिफारस केली जाईल, असे काकाणी यांनी सांगितले.
- 'मुलांच्या लसीकरणासाठी वेगळे बूथ'
मुंबईमध्ये १५ ते १७ वयोगटातील लहान मुलांचे लसीकरण सुरु आहे. त्याचसोबत वयोवृद्ध आणि आरोग्य, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जात आहे. लहान मुलांच्या लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे. यावर बोलताना सुरुवातीला ९ केंद्रांवर लसीकरण सुरु केले. यामुळे लसीकरणाचा एकदा कमी दिसते आहे. आता मुंबईमधील ३५० लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाईल. त्यात १५ ते १७ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी वेगळे बूथ असतील. तसेच शाळा, कॉलेज आणि वस्तीपातळीवर कॅम्प आयोजित करून लसीकरण केले जाईल, असे काकाणी यांनी सांगितले.
हेही वाचा - Fund For Corona corona Prevention : कोरोना प्रतिबंधाकरिता जिल्ह्यांना 38 कोटींचा निधी वितरीत