मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. निवडणूक कधी लागेल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. मात्र, निवडणुक कधीही लागली तरी त्यासाठी लागणारे बूथ, मतदार केंद्रांमध्ये लागणार्या साहित्याच्या खरेदी व त्यासाठी निविदा प्रक्रिया तसेच वॉर्डनिहाय मतदार याद्यांचे काम वेगाने सुरु आहे. (Additional Commissioner Suresh Kakani) यामुळे निवडणुक कधीही लागली तरी त्यासाठी आधीच तयारी करून ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
निवडणुकीसाठीची तयारी जोरात -
मुंबई महानगरपालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपली आहे. याआधी निवडणूक होणे आवश्यक होती. मात्र, कोरोना व इतर प्रशासकीय कारणांनी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सध्या प्रशासकाकडून कामकाज पाहिले जात आहे. निवडणूक कधीही होऊद्या पण निवडणुकीची तयारी मात्र वेळेत पूर्ण व्हायला हवी यासाठी पालिकेने आवश्यक काम सुरु केले आहे.
खरेदीसाठी निविदा प्रक्रिया
प्रशासकीय निर्णय कोणत्याही क्षणी आला तरी आपली यंत्रणा तैनात ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. निवडणूकीसाठी ८५०० बूथ असायचे कोरोनाच्या नियमावलीचे पालन करता यावे यासाठी बूथची संख्या वाढवून ११ हजार करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी लागणारे आवश्यक साहित्य व ते खरेदीसाठी निविदा प्रक्रिया तसेच मतदार याद्या अपडेट करण्याचे काम आदी प्रक्रिया पालिकेने वेगाने सुरु केली आहे.
दराबाबत हमीपत्र घेणार -
पालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. ती कधी लागेल हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे आताच्या दराने वस्तूंची खरेदी होत आहे. त्यामुळे नंतर पुरवठादारांकडून वाढीव किंमत मागण्याचा प्रकार होऊ नये यासाठी त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे. खरेदी आणि निविदा प्रक्रियेसाठी १८ झोनमध्ये विभागणी करून प्रकिया राबवण्यात येत आहे. यानुसार त्यांना आताच्याच दराने वस्तूंचा पुरवठा करावा लागणार आहे. यामध्ये कुठल्याही पुरवठादाराने नकार दिल्यास दोन नंबरवर असणार्या कंत्राटदाराकडून वस्तूंचा पुरवठा करून घेण्यात येणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
प्रभाग रचना रद्द -
मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग होते. त्यात ९ ने वाढ करून २३६ प्रभाग करण्यात आले. त्यासाठी पालिकेने प्रभाग रचना नव्याने केली. त्यासाठी हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी घेतली. मात्र, ही प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. आता नव्या नियमानुसार राज्य सरकार प्रभाग रचना करणार आहे. त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने निवडणुका वेळेवर होणार नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - Pravin Darekar : प्रविण दरेकरांवर गुन्हा दाखल; सुडभावनेने कारवाई केल्याची देरेकरांची प्रतिक्रिया